नागपूर : जागतिक पातळीवर फॅसिस्ट आणि भांडवलशाही यांची अभद्र युती झाली आहे. ही युती संपूर्ण जगच उध्वस्त करायला निघाली आहे. या युतीने असत्याला प्रमाण मानले असून सत्य हतबल झाले आहे. असत्य सत्यावर वरचढ झाले आहे. फॅसिस्ट आणि भांडवलदारांनी उभे केलेले हे आव्हान केवळ जागतिक स्तरावर राहिले नसून ते गल्ली बोळात पोहोचले आहे. या नव्या संकटकाळात बुद्ध आणि बाबासाहेब आपल्याला काय मदत करू शकतात याचा शोध प्रज्ञावंतांनी घेतला पाहिजे. फॅसिस्टांशी लढणारी नव आधुनिकता जन्मास घातली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
करूणा सांस्कृतिक भवन येथे यशवंत मनोहर प्रतिष्ठान आयोजित कविसूर्य यशवंत मनोहर काव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते सुरेई ससाई होते.
यशवंत मनोहर म्हणाले, महाराष्ट्रात आणि देशात राजकारण उरलं नसून सध्या राजकारण म्हणून जे सुरू आहे ते राजकारणाचं बेईमानीकरण होय. ही राजकारणी मंडळी जनतेवर असत्य थोपविण्यात यशस्वी झाली आहेत. या गढूळ सामाजिक आणि राजकीय वातावरणात सामान्य माणसांनी बुद्धी शाबूत ठेवून लोकशाही आणि संविधानिक मूल्ये वाचवण्यासाठी पुढे यायला हवे. तरच या देशाला भवितव्य असेल.
यावेळी डॉ. अशोक पळवेकर ( असहमतीचे रंग), प्रशांत वंजारे ( आम्ही युद्धखोर आहोत), भाग्यश्री केसकर ( उन्हानं बांधलं सावलीचं घर) यांना भंते सुरेई ससाई यांच्या हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह आणि दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. 'पर्यायाचे पडघम' या डॉ. प्रकाश राठोड यांनी संपादित केलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. युगसाक्षी प्रकाशनाच्या या काव्यसंग्रहात यशवंत मनोहर यांच्या कवितीक जगण्यावर महाराष्ट्रातील ८१ कविंनी कविता लिहिल्या आहेत.
यावेळी संपादक श्रीपाद अपराजित, ताराचंद खांडेकर, प्रकाश राठोड, अनमोल शेंडे, सर्जनादित्य मनोहर, प्रभु राजगडकर यांनी सुद्धा समायोजित विचार मांडले. प्रास्ताविक प्रमोद नारायणे यांनी केले तर संचालन डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी केले.