मॉडर्न ट्रेडिशनचे नवीन फ्यूजन, २२ प्रकारात मराठमोळी नऊवारीची 'फॅशन'
By मंगेश व्यवहारे | Published: August 28, 2023 11:01 AM2023-08-28T11:01:02+5:302023-08-28T11:01:37+5:30
ब्राह्मणी, पेशवाई, मस्तानी ते देवसेना अशा २२ प्रकारात नागपूरकर फॅशन डिझायनरनी साकारली नऊवारी
मंगेश व्यवहारे
नागपूर : प्रतिभावंत चित्रकार राजा रवी वर्मा हिंदू देवतांचे चित्र रेखाटण्यासाठी स्त्रियांच्या उत्कृष्ट वस्त्राच्या शोधात होते. अखेर त्यांनी नऊवारी पसंत केली. कारण हा एक असा पेहराव आहे जो कुठल्याही स्त्रीला शोभून दिसतो. मराठमोळी नऊवारीची महाराष्ट्राला हजारो वर्षांची परंपरा आहे. पण नऊवारी नेसणे आणि नेसवून देणे एक आव्हान असल्याने हा पेहरावा फॅशनच्या जगतातून बाहेर पडला होता. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला फॅशनच्या जगतात ग्लॅमर मिळावा म्हणून नागपूरचे श्रीकांत शिरभाते यांनी मॉडर्न आणि ट्रेडिशनचे फ्यूजन करून नऊवारी स्त्रियांच्या मनामनांत रुजविली. आज ती महाराष्ट्रीयनच नाही तर इतर धर्मीय स्त्रियांच्या पसंतीस उतरली आहे.
नऊवारी हा एक साडीसारखाच कापड आहे. जो सलग ९ मीटरचा असतो. नऊवारी नेसायची म्हणजे स्त्रियांना चांगलीच कसरत व्हायची. नऊवारीचा मध्य दोन भागात घडी करून काढायचा. मग तो मध्य मागे कंबरेवर ठेवून नऊवारीची दोन टोकं पुढे आणायची. त्यांची पोटावर घट्ट गाठ मारायची. निऱ्या घालून पाठीमागे कंबरेत खोचून द्यायचे. हे आजच्या तरुणींना अवघडल्यागत होत असल्याने फॅशन डिझायनर श्रीकांत शिरभाते यांनी नऊवारी नेसण्याची पद्धतच सोपी करून टाकली. तरुणींना सहज घालता येईल अशा नऊवारी त्यांनी शिवल्या आणि त्या तरुणींना, स्त्रियांना रुचल्या. त्यानंतर त्यांनी नऊवारीला वेगवेगळ्या प्रकारात साकारणे सुरू केले.
देशभरातील विविध राज्यांतून २९ प्रकारच्या नऊवारी कापडांचा शोध घेतला. कल्पकतेतून २२ प्रकारात ते नऊवारी साकारल्या. पुन्हा नवीन ६ प्रकारात त्यांचे काम सुरू आहे. मराठमोळ्या नऊवारीचा ब्राह्मणी हा सर्वात पहिला प्रकार, पेशवे पुण्यात आल्यानंतर स्त्रिया पेशवाई पद्धतीने नऊवारी घालायच्या. त्याकाळी स्त्रिया युद्धाला जाताना मराठा नऊवारी परिधान करायच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यासाठी मराठवाडा नऊवारी घातली जायची. परंपरेने आलेल्या या चार प्रकाराबरोबरच श्रीकांत शिरभाते यांनी आपल्या कल्पकतेने नऊवारीचे २२ प्रकार साकारले. यात मस्तानी, राजलक्ष्मी, त्रिवेणी, महालक्ष्मी, दमयंती, पद्मावती, वरदलक्ष्मी, राजराजेश्वरी, वैजयंती, लावणी, पद्मिनी, अरुंधती, कृतिका आणि देवसेना या नावाने त्यांनी नऊवारीला वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साकारले आहे. गेल्या १० ते १२ वर्षांत १ लाखावर महिलांना नऊवारी उपलब्ध करून दिली आहे.
- फुटपाथवरील दुकान झाले महाराष्ट्रातील नऊवारीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट
महालातील पाताळेश्वर मंदिराजवळ श्रीकांत शिरभाते यांचे वडील मनोहर शिरभाते हे फुटपाथवर ऑल्ट्रेशनचे काम करायचे. त्याकाळी श्रीकांत आणि त्यांचा लहान भाऊ आशिष यांनी आईवडिलांसोबत कष्ट उपसले. भाजी विकण्यापासून बाजारात ओझे उचलण्याचे काम केले. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन श्रीकांत हे फॅशन डिझायनर झाले. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सिनिअर फॅशन डिझायनर म्हणून काम केले. राजा शिवछत्रपती मालिकेमध्ये असिस्टंट कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केले. पण २०१० ला ते नागपुरात आले. एक असा प्रसंग घडला की त्यांनी नागपुरातच काहीतरी वेगळे करण्याचा संकल्प केला. ज्या फुटपाथवर वडील ऑल्ट्रेशन करायचे, तिथे आज त्यांनी महाराष्ट्रातील पहिले नऊवारीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट साकारले आहे. भाऊ आशिषनेही या व्यवसायाचा मोठा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे ही प्रेरणा श्रीकांत यांना त्यांच्या आईकडून मिळाली.
कमीत कमी किमतीत लोकांपर्यंत नऊवारी पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. लग्नसोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमात वापरली जाणारी नऊवारी महाराष्ट्रातील प्रत्येक सणात वापरली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. नऊवारीतील आकर्षक डिझाईनमुळे आता इतर धर्मातील स्त्रियांकडूनही भरपूर मागणी आहे. आम्ही दररोज ७० नऊवारी बनवितो, १ महिन्याचे वेटिंग असते.
- श्रीकांत आणि आशिष शिरभाते
शिरभाते नऊवार