कधीही उभी फूट न पडलेला पक्ष म्हणजे भाजप, वर्धापनदिनानिमित्त फडणवीसांचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 10:24 AM2024-04-06T10:24:28+5:302024-04-06T10:25:53+5:30
DCM Devendra Fadnavis On BJP : काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या मोजताही येणार नाही. कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली, समाजवादी पक्षाची इतकी शकलं झाली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल, असं म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला.
भारतीय जनता पक्षाचा ४५ वा वर्धापन दिन सोहळा नागपुरात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. "भाजपचे जगात सर्वाधिक सदस्य आहेत. भारतात ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार, आमदार, विधानपरषद सदस्य, महापौर, सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य असा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जातं," असं फडणवीस म्हणाले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं भारतातच नाही, पंतप्रधानांच्या माध्यमातून संपूर्ण जगात भारताची एक प्रतिमा तयार केली आहे. मजबूत, न झुकणारा आणि विकासाकडे झेप घेणारा भारत अशी प्रतिमा तयार केली आहे, याचा कार्यकर्ता म्हणून सर्वांना अभिमान आहे. भाजपनं जी वाटचाल सुरू केली आहे, देशाच्या इतिहासातील हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, ज्यात कधीही उभी फूट पडली नाही," असं फडणवीस म्हणाले.
"देशातील कोणताही पक्ष उचलला, त्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी उभी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या मोजताही येणार नाही. कम्युनिस्ट पक्षातही फूट पडली, समाजवादी पक्षाची इतकी शकलं झाली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल. भाजप बनल्यापासून आजपर्यंत कधीही फूट पडली नाही, तो एकसंध राहिला," असंही त्यांनी नमूद केलं.
"विचारांवर चालणारा पक्ष"
"पक्षात फूट पडली नाही, याचं एकमेव कारण आहे, या पक्षाने नेते कधी आत्मकेंद्रित नव्हते, स्वार्थी नव्हते, कार्यकर्ते स्वार्थी नव्हते. हा पक्ष कोणाला पंतप्रधान बनवण्यासाठी, कोणाला मुख्यमंत्री बनवण्याकरिता, कोणाला खुर्ची देण्याकरिता तयार करण्यात आलेला नाही. एका विचाराकरिता, भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरिता हा पक्ष तयार करण्यात आला. विचारांवर चालणारा पक्ष आहे म्हणूनच उभी फूट पडली नाही," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.