नागपूर जिल्ह्यात विजांचे तांडव! शेतकऱ्यासह शेतमजूर महिलेचा मृत्यू, दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 10:36 AM2022-08-05T10:36:51+5:302022-08-05T10:37:02+5:30
आजनीत बैल ठार
कन्हान/खापरखेडा/कामठी :नागपूर जिल्ह्यातील सावनेर, पारशिवनी आणि कामठी तालुक्यांत गुरुवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट झाला. त्यातच वीज पडून शेतकऱ्यासह शेतमजूर महिला तसेच नऊ माकडे आणि बैलाचा होरपळून मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले. जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या.
पारशिवनी तालुक्यातील बोर्डा शिवारातील शेतात धान रोवणीचे काम सुरू असताना दुपारी ४.४५ वाजता वीज कोसळली. यात शेतात काम करणारे राधेलाल भीमराव डहारे (वय २४, रा. आजनी, ता. रामटेक) यांचा मृत्यू झाला, तर जितेंद्र बाबूलाल लिल्हारे (२४, रा. आजनी) हा जखमी झाला. पारशिवनी तालुक्यातील दुसऱ्या घटनेत नंदा रामकृष्ण खंडाते, (रा. निलज) हिचा मृत्यू झाला, तर तिच्यासोबत काम करणारी रेखा मुकेश चौधरी गंभीर जखमी झाली. निलज शिवारात धान रोवणी सुरू असताना दुपारी ४.३० वाजेच्यासुमारास ही घटना घडली. शेतात काम करणारी रेखा हिच्यावर कन्हान येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामठी तालुक्यात आजनी शिवारातील शेतात वीज काेसळल्याने वखराला जुंपलेला एक बैल ठार झाला. या घटनेत शेतमजूर व एक बैल थाेडक्यात बचावले. दुपारी ४ वाजेच्यासुमारास ही घटना घडली. नितीन कृष्णराव रडके यांची आजनी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीलगत रघुनाथ रडके यांची शेती आहे. गुरुवारी नितीन रडके यांची बैलजाेडी घेऊन रघुनाथ रडके यांच्या शेतात वखरणीचे काम सुरू हाेते. दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जाेर वाढल्याने शेतमजूर झाेपडीत आडाेशाला गेला. अशातच जाेरात कडाडलेली वीज थेट वखराला जुंपलेल्या बैलाच्या अंगावर काेसळल्याने बैल जागीच ठार झाला. दुसरा बैल पळत सुटल्याने ताे बचावला. शेतमालकाने घटनेची माहिती पाेलीसपाटील बळवंत रडके, काेतवाल राजू लायबर यांना दिली.
मंदिराच्या कळसावरही...
खापरखेडा नजीकच्या वलनी वस्तीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसावर वीज काेसळल्याने तेथील विद्युत साहित्य जळाले. या घटनेबाबत सावनेरचे तहसीलदार व तलाठ्यांना माहिती देण्यात आली.
नऊ माकडांचा मृत्यू
सावनेर तालुक्यातील वलनी शिवारात दुपारी १ वाजेच्यासुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. येथे वलनी वस्तीजवळच्या कन्हान नदीकाठावरील माकडांचा कळप असलेल्या पिंपळाच्या झाडावर वीज काेसळली. त्यात झाडावरील नऊ माकडांचा हाेरपळून मृत्यू झाला. गावातील नंदकिशाेर आंबिलडुके तिथे पाेहाेचला असता, त्याला झाडाखाली मृत माकडे दिसून आली. याबाबत त्याने वलनी ग्रामपंचायत, वन विभागाला सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीवप्रेमी दादू गणवीर, जि. प. सदस्य प्रकाश खापरे घटनास्थळी पाेहाेचले. वन विभागाचे आश्विन काकडे, रेखा चोंदे, अनिल राठोड, पाेलीस उपनिरीक्षक नामदेव धांडे, शिपाई सदानंद नारनवरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, वन अधिकारी व पाेलिसांनी जेसीबी बाेलावून मृत माकडांना जमिनीत पुरले.