लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकारी करणाऱ्या आरोपीने त्याच्या दोन मित्रांसह स्वप्निल प्रदीप मेश्राम (वय २४) नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून त्याच्या वडिलांना तीन लाखाच्या खंडणीची मागणी केली. प्रसंगावधान राखत स्वप्निलच्या वडिलांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी तक्रार देताच प्रतापनगर पोलिसांनी धावपळ करून अपहरण करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली. श्रेयस शेखर बोरकर (वय २५, रा. सुभाषनगर),राहुल डिगांबर मेश्राम (वय २४, रा. गोपाल नगर) आणि दिनेश नत्थुजी शहाणे (वय २५, रा. भामटी) अशी आरोपींची नावे आहेत.प्रदीप घनश्याम मेश्राम हे प्रॉपर्टी डीलर असून त्यांचा मुलगा स्वप्निल हा इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकतो. त्याच कॉलेजमध्ये आरोपी श्रेयस बोरकर शिकतो. तो अवैध सावकारी करतो. काही महिन्यांपूर्वी स्वप्निलने श्रेयसकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ठरल्याप्रमाणे व्याज आणि मूळ रक्कम असे एकूण १ लाख रुपये स्वप्निलने बोरकरला परत केले. मात्र, चक्रवाढ व्याजाचे गणित सांगून बोरकरने स्वप्निलला पुन्हा १६ हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. स्वप्निलने ते देण्यास नकार दिला. त्याला धाक दाखवूनही तो मानत नसल्याचे पाहून आरोपी बोरकरने त्याचे अपहरण करून खंडणीचा कट रचला. त्यानुसार, २८ एप्रिलला सकाळी ८ वाजता बोरकरने फोन करून तो कुठे आहे, हे जाणून घेतले. त्यानंतर त्याला आरोपींनी तुकडोजी पुतळा चौकातील साई लॉज जवळ बोलवले. तेथून आरोपींनी स्वप्निलला एका कारमध्ये कोंबले आणि आयटी पार्क परिसरात नेले. तेथे त्याला तीन लाख रुपयांची खंडणी मागितली.त्याने नकार देताच त्याला धाक दाखविण्यात आला. त्यानंतर त्याला सीसीडी कॅफेजवळच्या राधे मंगलम इमारतीजवळ आणले. तेथून स्वप्निलला त्याच्या वडिलांना फोन करून तीन लाखाची व्यवस्था करण्यास सांगितले.स्वप्निलच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत कुठे रक्कम पोहचवायची, त्याबाबत विचारणा केली. स्वप्निलने पत्ता सांगितल्यानंतर ते सरळ पोलिसांकडे धावले. त्यांनी अपहरण आणि खंडणीची माहिती देताच पोलिसांनी कारवाईचा सापळा लावला. स्वप्निलने सांगितलेल्या पत्यावर तीन लाख रुपये नेऊन देण्याची तयारी मेश्रामने दाखवली. त्यानंतर प्रदीप मेश्राम यांच्या अवतीभवती साध्या वेशातील पोलीस प्रतापनगर रोडवरच्या एका अपार्टमेंटमध्ये पोहचले. मेश्राम यांनी आरोपींच्या फ्लॅटचे दार ठोठावत आवाज दिला. रक्कम सोबत असल्याचेही सांगितले. आरोपींपैकी एकाने दार उघडताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपींवर झडप घातली. तेथे आरोपींसोबत एक युवतीही पोलिसांना आढळली. त्यांना अपहरण आणि खंडणी वसुलीच्या आरोपात अटक करण्यात आली.हत्येचाही होता कटआरोपी श्रेयश, दिनेश आणि राहुल यांनी स्वप्निलचे अपहरण करून त्याला दिवसभर मारहाण केली. त्यानंतर त्याला रात्री सदनिकेत डांबण्यात आले. तेथेही त्याला रात्रभर मारहाण केली. तुझ्या वडिलांनी रक्कम पोहचवली नाही तर गळा कापून तुझी हत्या करू, असे आरोपी सांगत होते. मात्र, प्रसंगावधान राखत पोलिसांनी वेळीच आरोपींना अटक केल्याने अप्रिय घटना टळली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगरचे ठाणेदार सुनील शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण : तीन लाखाच्या खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:25 AM
अवैध सावकारी करणाऱ्या आरोपीने त्याच्या दोन मित्रांसह स्वप्निल प्रदीप मेश्राम (वय २४) नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून त्याच्या वडिलांना तीन लाखाच्या खंडणीची मागणी केली. प्रसंगावधान राखत स्वप्निलच्या वडिलांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी तक्रार देताच प्रतापनगर पोलिसांनी धावपळ करून अपहरण करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली.
ठळक मुद्देअवैध सावकारी करणाऱ्याचे साथीदारांच्या मदतीने कुकृत्य