लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध बांधकाम केल्याने नगरपरिषदेच्या शाळेची संरक्षण भिंत पडल्याप्रकरणी नरखेडचे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांचे सदस्यत्व (नगरसेवक) रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील तक्रारीवर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुनावणी घेऊन शुकवारी हे आदेश जारी केले आहे.नागपूर जिल्ह्यातील नरखेड नगरपरिषदेचे तत्कालीन सदस्य अभिजित गुप्ता यांनी कुठलीही मंजुरी न घेता अवैध बांधकाम केले. तसेच या अवैध बांधकामामुळे नगरपरिषदेच्या शाळेची संरक्षक भिंत पडली. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला गेला. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४२ च्या तरतुदीनुसार गुप्ता यांचे सदस्यत्व (नगरसेवक) रद्द करण्यात यावे, अशी तक्रार त्यांचे नगरपरिषदेचे दुसरे सदस्य मनोज कोरडे यांनी राज्य शासनाकडे केली होती. ही तक्रार गेल्या वर्षी करण्यात आली होती. यासंदर्भात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. पाटील यांनी ४ एप्रिल २०१८, ८ मे २०१८ आणि १६ मे २०१८ रोजी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गुप्ता यांनी अवैध बांधकाम केल्याचे सिद्ध होते. केवळ अवैध बांधकामच केले नाही तर त्या बांधकामामुळे सार्वजनिक इमारतीची संरक्षक भिंतही पडली आहे. भिंत पडल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा हा प्रश्न गैरवर्तनाने निर्माण झाल्याचे स्पष्ट करीत राज्यमंत्री पाटील यांनी अभिजित गुप्ता यांचे सदस्यत्व रद्द करीत पुढील पाच वर्षासाठी पालिका सदस्य होण्यास किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र ठरविले आहे.
नागपूर जिल्ह्यातील नरखेडचे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 9:25 PM
अवैध बांधकाम केल्याने नगरपरिषदेच्या शाळेची संरक्षण भिंत पडल्याप्रकरणी नरखेडचे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांचे सदस्यत्व (नगरसेवक) रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील तक्रारीवर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुनावणी घेऊन शुकवारी हे आदेश जारी केले आहे.
ठळक मुद्देनगरविकास राज्यमंत्र्यांचे आदेश : अवैध बांधकाम भोवले