योगेश पांडे, नागपूर : सीबीआयमधून बोलत असून आधार कार्डवरून अनेक सीमकार्ड विकत घेऊन अवैध कामे करण्यात येत असल्याची बतावणी करत एका व्यक्तीला ५० हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
५९ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार १८ मार्च रोजी सकाळी त्यांना ८८०८२४२८३५ या क्रमांकावरून फोन आला. तुमच्या आधार कार्डवरून मुंबईत सीमकार्ड घेण्यात आले असून त्याचा उपयोग अवैध धंद्यांसाठी होत आहे. लोकांनी याविरोधात तक्रारी केल्या आहेत, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्याने तो सीबीआयमधून बोलत असल्याचा दावा केला. त्याने तक्रारदाराना गुन्ह्याचा खोटा अपराध क्रमांक सांगितला. या प्रकरणात अटक झाल्यास दीड ते तीन महिने तुरुंगात रहावे लागेल अशी भिती दाखविली. त्यानंतर त्याने सेटलमेंटच्या नावाखाली ५० हजारांची मागणी केली. घाबरलेल्या तक्रारदाराने ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र समोरील व्यक्तीने परत पैसे पाठविण्यास सांगितले. यावरून तक्रारदाराला संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.