- योगेश पांडे नागपूर - ओळखीतून झालेल्या प्रेमाचा गैरफायदा घेत एका आरोपीने २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केला. तिने लग्नासाठी विचारणा केली असता त्याने नकार दिला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
जुबेर रफीक शेख (२५, खरबी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची २० वर्षीय तरुणीशी ओळख होती. त्याने तिला अगोदर मैत्रीसाठी विचारणा केली व त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आश्वासन देत मे महिन्यात तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वारंवार तिच्यावर हॉटेल किंवा स्वत:च्या घरी अत्याचार केले. तरुणी त्याला जेव्हाही लग्नाबाबत विचारणा करायची तो टाळाटाळ करायचा. डिसेंबर महिन्यात तिने त्याला परत विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणीला मोठा धक्का बसला व ती नैराश्यातच गेली. अखेर तिने हिंमत दाखवली व वाठोडा पोलीस ठाणे गाठून जुबेरविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.