राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यास क्षमा नाही
By Admin | Published: July 30, 2015 03:22 AM2015-07-30T03:22:59+5:302015-07-30T03:22:59+5:30
राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या दोन मुख्याध्यापकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्षमा मिळाली नाही.
हायकोर्ट : एफआयआर रद्द करण्यास नकार
नागपूर : राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या दोन मुख्याध्यापकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात क्षमा मिळाली नाही. न्यायालयाने या मुख्याध्यापकांविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.
प्रफुल्ल विजय अनिलवार (२८) व कविता उदयसिंग चौहान (२८) अशी मुख्याध्यापकांची नावे असून, ते अमरावती येथील रहिवासी आहेत. गेल्या महाराष्ट्रदिनी (१ मे) दोन्ही मुख्याध्यापकांच्या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. नियमानुसार सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरविणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही मुख्याध्यापकांच्या शाळेत रात्री ११ वाजतापर्यंत राष्ट्रध्वज वरतीच लहरत होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राष्ट्रध्वज खाली उतरविण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही मुख्याध्यापकांविरुद्ध राष्ट्रीय ध्वज अवमान अधिनियमाच्या कलम २ अन्वये एफआयआर नोंदविला आहे.
हा एफआयआर रद्द करण्यासाठी मुख्याध्यापकांनी उच्च न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. हा गुन्हा जाणीवपूर्वक केला नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. यामुळे संबंधित वकिलाने अर्ज मागे घेतला. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी युक्तिवाद केला.(प्रतिनिधी)