लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे आई-वडील किंवा दोघांपैकी एकाचे छत्र हरविलेल्या बालकांना आधार देण्यासाठी श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे ‘सोबत’ पालकत्व या प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा प्रारंभ झाला. यावेळी नोंदणी झालेल्या १०० बालकांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. सोबतच दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील छत्र हरविलेल्या पाल्यांचेसुद्धा पालकत्व स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सोबत’द्वारे शिक्षण, आरोग्य, आहार, समुपदेशन आणि कौशल्य विकासावर कार्य केले जाणार आहे.
यावेळी क्रीडा प्रशिक्षक, कलावंत यांना धान्य किट वितरण, कोविड योद्धा, फ्रंटलाईन वर्कर यांचा सत्कार, ‘अनमास्किंग इंडिया’ या पुस्तकाचे वितरणदेखील करण्यात आले. लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाला माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व माजी महापौर संदीप जोशी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने एका विधायक प्रकल्पाची सुरुवात होत असून समाजकारण जास्त महत्त्वाचे आहे, असे फडणवीस म्हणाले. कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा संस्थान ‘सोबत’ला पूर्ण सहकार्य करील, असे बावनकुळे यांनी सांगितले. कुठल्याही पाल्याला अत्यावश्यक आरोग्य सेवेची मुंबई किंवा वा अन्य मोठ्या शहरात गरज पडल्यास त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांनी स्वीकारली. संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. वर्धा, चंद्रपूर येथेही ‘सोबत’चे काम सुरू करण्याचा मनोदय जोशी यांनी व्यक्त केला.