रामटेक (नागपूर) : समाेर असलेल्या सायकलला धक्का लागताच माेटारसायकल अनियंत्रित झाली आणि दुचाकीस्वार मुलगा व आई राेडवर काेसळले, तर तिचा नातू राेडच्या बाजूला फेकला गेला. स्वत:ला सावरण्याच्या आतच मागाहून आलेल्या ट्रकने आईसह मुलाला चिरडल्याने त्या दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नातू मात्र किरकाेळ जखमी झाला. ही घटना रामटेक पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री शिवारात रविवारी (दि. १) दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सूर्यलता अंताराम चचाने (वय ४५) व अमित अंताराम चचाने (२०, दाेघेही रा. बाेर्डा, ता. रामटेक) अशी मृतांची नावे असून, प्रियांशू कवडू कोहळे (२, रा. भोंदेवाडा, ता. रामटेक) हा किरकाेळ जखमी झाला. अमित हा सूर्यलता यांचा मुलगा व प्रियांशू हा नातू (मुलीचा मुलगा) हाेय. तिघेही एमएच-३१/ एव्ही-५४०९ क्रमांकाच्या माेटारसायकलने कांद्री चेकपाेस्टकडून मनसरच्या दिशेने जात हाेते. अमित माेटारसायकल चालवित हाेता, तर सूर्यलता नातवाला घेऊन मागे बसल्या हाेत्या.
समाेर असलेल्या सायकलला धडक लागताच अमित व सूर्यलता राेडवर मध्यभागी काेसळले आणि प्रियांशू राेडलगत फेकला गेला. त्यातच वेगात आलेला ट्रक त्या दाेघांच्या अंगावरून वेगात निघून गेला. त्यामुळे दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रियांशू मातीवर फेकला गेल्याने त्याला फारसी गंभीर दुखापत झाली नाही. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अपघात
पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथे प्रियांशूवरही उपचार करण्यात आले. अपघात हाेतच पाेलिसांनी या लेनवरील वाहतूक दुसऱ्या लेनवर वळविली हाेती. दुचाकीचालक अमितने हेल्मेटचा वापर केला नव्हता, अशी माहिती पाेलिसांनी दिली. हा वर्षाच्या पहिल्याच दिवशीचा या भागातील पहिलाच अपघात असल्याने चर्चेचा विषय ठरला हाेता.