नागपूर : शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या मुलीला नागपूर विमानतळावर साेडून दिल्यानंतर आई, वडील मुलासह कारने नागपूरहून गडचिराेलीच्या दिशेने निघाले. भिवापूर शहरालगतच्या तास काॅलनीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने सुसाट कार राेडलगतच्या खड्ड्यात शिरली व उलटली. यात मुलाचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला तर आई, वडील गंभीर जखमी झाले. ही घटना साेमवारी (दि. २२) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
कृष्णा सुनील बट्टूवार (१६) असे मृत मुलाचे तर सुनील मुरलीधर बट्टूवार (५५) व वैशाली सुनील बट्टूवार (४५) असे गंभीर जखमी वडील व आईचे नाव आहे. बट्टूवार कुटुंबीय गडचिराेली येथील रहिवासी असून, सुनील बट्टूवार इलेक्ट्रिक कंत्राटदार आहेत. त्यांची सायली नामक मुलगी अमेरिकेत बीई करीत असल्याने तिघेही तिला नागपूर विमानतळावर साेडून देण्यासाठी एमएच-३३/ए-६२९२ क्रमांकाच्या कारने गडचिराेलीहून नागपूरला आले हाेते.
त्यांनी सायलीला विमानतळावर साेडले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. ते भिवापूर शहरालगतच्या तास काॅलनीजवळ पाेहाेचताच चालकाचा सुसाट कारवरील ताबा सुटला आणि ती कार थेट राेडलगतच्या खड्ड्यात शिरून उलटली. यात तिघांनाही गंभीर दुखापत झाली. भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, कृष्णाचा वाटेतच मृत्यू झाला. सुनील व वैशाली यांच्यावर नागपुरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
झाेपेच्या डुलकीची शक्यता
ती कार सुनील बट्टूवार चालवित हाेते. त्यांना झाेपेची डुलकी आल्याने कारचे ब्रेक दबल्या गेले आणि ती कार घासत जात खड्ड्यात शिरली. पहाटेच्यावेळी राेडवर फारशी वर्दळ नसल्याने त्यांना वेळीच मदत मिळाली नाही. सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वैशाली कशाबशा कारच्या बाहेर आल्या आणि त्यांनी राेडवर येऊन मदत मागितली. तेव्हा अपघात झाल्याचे इतरांच्या निदर्शनास आले.