नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातून पळाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 09:51 PM2019-02-09T21:51:35+5:302019-02-09T21:53:06+5:30
नागपूरकडे येत असलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी चोप देऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु आयता आरोपी ताब्यात दिल्यानंतर त्याला सांभाळणे लोहमार्ग पोलिसांना जमले नाही. गुन्हा दाखल करीत असताना आरोपी त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागला नाही. ठाण्यातून आरोपी पळून गेल्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. उलट अशा प्रकारची घटना घडलीच नसल्याचे सांगून या घटनेसंदर्भात लोहमार्ग पोलिसांनी माहिती देण्याचे टाळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकडे येत असलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी चोप देऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु आयता आरोपी ताब्यात दिल्यानंतर त्याला सांभाळणे लोहमार्ग पोलिसांना जमले नाही. गुन्हा दाखल करीत असताना आरोपी त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध लागला नाही. ठाण्यातून आरोपी पळून गेल्यामुळे लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. उलट अशा प्रकारची घटना घडलीच नसल्याचे सांगून या घटनेसंदर्भात लोहमार्ग पोलिसांनी माहिती देण्याचे टाळले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसच्या स्लिपर क्लास कोचमध्ये आरोपी आणि फिर्यादी प्रवास करीत होते. शेगाव रेल्वेस्थानकाजवळ आरोपीने ब्लँकेट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली. मुलीने मदतीसाठी विरोध केला. त्यानंतर सहप्रवाशांनी आरोपीला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर आरोपीला रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सोपवून नागपूर लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. नागपुरात गाडी आल्यानंतर आरोपीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. फिर्यादीचे कुटुंबीयही पोहोचले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळाला. आरोपी पळाल्याचे समजताच लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अशी घटना घडलीच नसल्याचे सांगितले.
जबाबदार अधिकाऱ्यांनी केली दिशाभूल
लोहमार्ग पोलीस ठाण्यातून आरोपी पसार झाल्याची गंभीर घटना घडूनही लोहमार्ग पोलिसातील जबाबदार अधिकारी याबाबत काही बोलावयास तयार नव्हते. दिवसा कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक गोंडाणे यांचा मोबाईल सायंकाळी स्विच ऑफ होता. अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
इतवारी-कामठीत शोध, मुंबईला जाणार पोलीस
आरोपीने पलायन केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल टॉवरच्या लोकेशननुसार त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक इतवारी-कामठी परिसरात रवाना केले. तर आरोपी मुंबईला नोकरी करीत असल्यामुळे दुसरे पथक मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना
‘आरोपी लोहमार्ग पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. उद्यापर्यंत आरोपीला शोधण्यात यश येईल.’
अमोघ गावकर, लोहमार्ग पोलीस अधीक्षक