खूनाच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीला बेड्या
By दयानंद पाईकराव | Published: March 16, 2024 04:57 PM2024-03-16T16:57:37+5:302024-03-16T16:59:39+5:30
जरीपटका पोलिसांचे पथक शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या दरम्यान गस्त घालत होते. त्यांना मेकोसाबाग परिसरात आरोपी अंकित हा कोणाचातरी जीव घेण्याच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.
नागपूर : कोणाचातरी खून करण्याच्या उद्देशाने मित्राचा देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीला व त्याच्या मित्राला जरीपटका पोलिसांनी अटक केली.
अंकित उर्फ निक्की दिलीप बहादुरे (२५, रा. लाल शाळेजवळ मेकोसाबाग जरीपटका) असे देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर आकाश सुभाष कटारीया (२६, रा. बडी मस्जीदमागे, गवळीपुरा सदर) असे देशी कट्टा देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. जरीपटका पोलिसांचे पथक शुक्रवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या दरम्यान गस्त घालत होते. त्यांना मेकोसाबाग परिसरात आरोपी अंकित हा कोणाचातरी जीव घेण्याच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस लेंडी तलाव येथे गेले असता आरोपी अंकित एका झाडाखाली दिसला. त्याला घेराव घालून ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेत एक सिल्व्हर रंगाचा देशी कट्टा व खिशात एक जीवंत काडतुस आढळले. हा देशी कट्टा आपला मित्र आकाशचा असल्याचे अंकितने सांगितले. त्यावर पोलिस आकाशच्या घरी गेले असता त्याने देशी कट्टा आपला असल्याची कबुली दिली. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी अंकित व आकाशविरुद्ध कलम ३, २५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.