नागपुरात आरोपीला २७ वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 09:45 PM2018-06-04T21:45:36+5:302018-06-04T21:46:20+5:30
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने तहसील पोलिसांच्या हद्दीतील जुन्या चार प्रकरणांवर नुकतेच निर्णय दिले. चारही प्रकरणांतील आरोपींना विविध कलमांतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. २७ वर्षे जुन्या एका प्रकरणात आरोपीला विविध कलमाखाली ८०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने तहसील पोलिसांच्या हद्दीतील जुन्या चार प्रकरणांवर नुकतेच निर्णय दिले. चारही प्रकरणांतील आरोपींना विविध कलमांतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. २७ वर्षे जुन्या एका प्रकरणात आरोपीला विविध कलमाखाली ८०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
किशोर भिका उकर्डे (४५) असे आरोपीचे नाव असून तो भानखेडा येथील रहिवासी आहे. ९ जून १९९१ रोजी एका लग्नात आरोपी मुलींना छेडत होता. त्यामुळे लग्नातील लोकांनी त्याला हटकले. त्यानंतर आरोपीने हटकणाऱ्यांना शिवीगाळ व घरावर दगडफेक केली. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती.
मेयो रुग्णालय परिसरात राहणारा आरोपी मनोज छोटेलाल समुद्रे (३५) याला दोन प्रकरणांत शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीने १० जून २००८ रोजी रात्री १० च्या सुमारास पंचशीलनगर येथील जनार्धन कोवे यांना विनाकारण मारहाण केली होती. त्या प्रकरणात आरोपीला एक महिना कारावास व १०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, ३० जून १९९३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास आरोपीने रमेश समुद्रे यांना भाल्याच्या पात्याने गंभीर जखमी केले होते. त्या प्रकरणात आरोपीला ३० दिवस कारावास व २०० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली.
संतोष गुरुदास टेंभुर्णे (३३) असे चौथ्या प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो भानखेडा येथील रहिवासी आहे. त्याने २० जुलै २००८ रोजी दुपारी ३ च्या सुमारास सीए रोडवरील शहीद काकडे प्राथमिक शाळेतील ५०० रुपये किमतीचा लोखंडी बेंच चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात आरोपीला २५ दिवस कारावास व १०० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड. व्ही.डी. हुकरे यांनी बाजू मांडली.