तीन घरफोडीतील आरोपी अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई
By योगेश पांडे | Published: May 18, 2024 04:50 PM2024-05-18T16:50:27+5:302024-05-18T16:52:47+5:30
Nagpur : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने तीन विविध कारवायांमध्ये आरोपींना केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन घरफोड्यांच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने तीन विविध कारवायांमध्ये आरोपींना अटक केली.
३० एप्रिल ते ११ मे या कालावधीत सुरेश शंकरराव कटाईन (६८, भवानीनगर, पारडी) हे त्यांच्या घराला कुलूप लावून चंद्रपूरला गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर फोडत १.०५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्यांचे नेटवर्क व सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य उर्फ गब्बर विकास बब्बर (२३, नागार्जुन कॉलनी, जरीपटका) व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
दुसरा गुन्हा शिवमनगर, पारडी येथील निवासी रितीक झुलेलाल पटले (२२) यांच्याकडे झाला होता. ते १४ एप्रिल रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले असता आरोपींनी ३७ हजार ५०० रुपयांची घरफोडी केली होती. या तपासादरम्यान पोलिसांनी मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीद (२२, सिंधीबन, मोठा ताजबाग) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांनी घरफोडीची कबुली दिली.
तिसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. मिरे ले आऊट येथील न्यू गिनी वर्ल्ड नावाच्या ऑटोमोबाईल दुकानाला फोडून माल लंपास करण्यात आला होता. पोलिसांनी खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूख (२०, आझाद कॉलनी, मोठा ताजबाग) व सोहेल कसाई ईकबाल कुरेशी (१९, आझाद कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांनी सोहेल भांजा (मोठा ताजबाग) याच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, मधुकर काठोके, दशरथ मिश्रा, सतिश पांडे, संतोषसिंग ठाकूर, विजय श्रीवास, जितेश रेड्डी, दीपक लाकडे, दीपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार यांच्या पथकाने या तीनही कारवाया केल्या.