लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका निर्माणाधीन इमारतीतून इलेक्ट्रीक डीपीचे साडेचार लाखांचे साहित्य चोरणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी २४ तासांत अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रदीप प्रभाकर हेटे (४०, बेलतरोडी) हे श्रीकृष्ण लॅंड ॲंड डेव्हलपर्सचे व्यवस्थापक असून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा हरीचंद्रवेठा येथे त्यांची साईट सुरू आहे. तेथे त्यांनी इलेक्ट्रीकची डीपी लावली होती. तेथून १५ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी डीपीचे साडेचार लाखांचे साहित्य लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हर्ष बाबू शाहू (२०, इंदिरागांधीनगर, यशोधरानगर), मनोज लालसिंग चौहान (३३, विनोबा भावे नगर, यशोधरानगर) व अमित राजू शाहू (१९, म्हाडा कॉलनी, शांतीनगर) यांना ताब्यात घेऊन विचारणा केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून डीपीचे साहित्य, दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, राजेश लोही, आशिष कोहळे, टप्पूलाल चुटे, विशाल नागभिडे, सुधीर तिवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.