नरेश डोंगरे
नागपूर : रेमडेसिविरची काळाबाजारात विक्री करणारा एक आरोपी पाचपावली पोलिस ठाण्यातून पळून गेला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीपर्यंत पळालेल्या आरोपीचा शोध लागला नव्हता. उबेद रजा इकराम उल हक असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे पाचपावलीतील मुख्य गुरुद्वाराजवळ अपोलो मेडिकल स्टोअर्स आहे. तो येथून रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी करीत असल्याची माहिती पाचपावली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर, सापळा रचून त्यास अटक करण्यात आली होती.
पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांनी सापळा रचला आणि ५० हजार रुपयात दोन इंजेक्शन विकत घेण्यासाठी ग्राहकाला पाठविले. आरोपीने पैसे घेऊन ग्राहकाच्या हातात इंजेक्शन ठेवताच पाचपावली पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. नंतर उबेद रजा याला हे इंजेक्शन उपलब्ध करून देणारा दुसरा आरोपी अहमद हुसेन जुल्फिकार हुसेन या दोघांना पोलिसांनी २ मे ला न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवला. हे दोघे पाचपावली पोलिस ठाण्याच्या कोठडीत बंद होते. मंगळवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास पोलीस ठाण्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई सुरू होती. दुसऱ्याही काही गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यात होते. पोलीस ठाण्यात अशी गर्दी झाली असताना सायंकाळी ५ च्या सुमारास आरोपी उबेद रजा याने रोजा सोडण्याच्या बहाण्याने पोलिसांना हात तोंड धुण्यासाठी कोठडी बाहेर काढण्याची विनंती केली. माणुसकीखातर एका पोलिसाने त्याला कोठडीबाहेर काढले. हात तोंड धुतल्यावर उबेद ठाण्याच्या आवारात बसला. कारवाईच्या निमित्ताने पोलीस दुसऱ्या आरोपींच्या चौकशीत गुंतल्याची संधी साधून उबेदने ठाण्यातून पळ काढला. दरम्यान, कारवाईतून सवड मिळाल्यानंतर पोलिसांनी कोठडीत नजर टाकली असता उबेद गायब असल्याचे लक्षात आले. तो पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरात बराच वेळ धावपळ केली. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.
जागोजागी छापेमारीउबेदला शोधण्यासाठी शहर पोलिस दलातील वेगवेगळी पथके ठिकठिकाणी छापेमारी करत होती. मात्र उशिरा रात्रीपर्यंत तो हाती लागला नव्हता.