अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्ग ब्रॉडगेज व्हावा
By admin | Published: December 11, 2015 03:38 AM2015-12-11T03:38:40+5:302015-12-11T03:38:40+5:30
राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार पाठवणार केंद्राला प्रस्ताव: चंद्रकांत पाटील यांची माहिती
नागपूर : राज्य सरकारने अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्गाला ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती देत राज्य मंत्रिमंडळाने या संदर्भातील निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या संदर्भात राज्यातील मंत्री केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटणार आहेत.
आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या अशासकीय प्रस्तावावर पाटील बोलत होते. बच्चू कडू यांनी आपल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकून रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून तो बैतूलला जोडण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, यामुळे दिल्लीचे अंतर १५० किलोमीटरने कमी होईल. मेळघाटसारख्या विदर्भातील मागासलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही कृषी उत्पादनासाठी बाजार उपलब्ध होईल. या मार्गावरून चालणारी रेल्वेगाडी शकुंतलेच्या दयनीय अवस्था विशद केली. इंग्रज देश सोडून गेल्यावरही त्यांनी २००६ पर्यंत या रेल्वेगाडीचे संचालन केले. मागील १० वर्षांपासून हा रेल्वेमार्ग ही गाडी भारतीय रेल्वेच्या ताब्यात आहे. परंतु आजपर्यंत त्याच्या विकासासाठी किंवा देखरेखीसाठी काहीच करण्यात आलेले नाही. या मार्गावरील सर्वच रेल्वेस्टेशन मोडकळीस आले आहे. कधीही कोसळू शकतात. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानीही होऊ शकते, असेही आ. बच्चू कडू यांनी सांगितले.
या प्रस्तावाला उत्तर देताना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, रेल्वेमार्ग आणि स्टेशन हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असतात. राज्य सरकार त्यावर खर्च करू शकत नाही. त्यामुळे या स्टेशनला विकसित करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. केंद्राला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात या रेल्वेमार्गाला विकसित करण्यासाठी सर्वे सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
मागणीसाठी ते आ. बच्चू कडू यांच्यासोबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करायला दिल्लीला जातील. या रेल्वेमार्गाचे काम प्राधान्याने व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)