नागपूर : पूर्व, मध्य आणि नंतर असे कोरोनाने तुमच्या आयुष्याचे भाग केले आहेत. कोरोनापूर्व तुम्ही अनुभवला आहे. कोरोनाचा अनुभव घेत आहात आणि कोरोनानंतरचा काळ पुढे आहे. याच अनुभवाचा मागोवा आणि भविष्यवेधी चिंतन ‘गोविंदा इन लॉकडाऊन’ या दोन अंकी तुफान विनोदी नाटकाने केले. विशेष म्हणजे, नागपूरच्या रंगभूमीवरून पूर्णत: व्यावसायिकता जपणारे हे पहिलेच नाटक ठरले. नाटकात उतरलेले अभिनयातील हुकमी एक्के, कुशल दिग्दर्शन आणि लेखणीतून साकारलेले हसता हसता डोळ्यात अंजन घालणारे विनोदाचे तोफगोळे रसिकांना तणावाच्या या काळात रिलॅक्स करणारे ठरले.
संस्कार मल्टिसर्व्हिसेस निर्मित व गंधर्व क्रिएशन्स प्रकाशित या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाचे आयोजन लोकमत सखी मंच व श्रीमय ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. नाटकाचे लेखन देवेंद्र दोडके व दिग्दर्शन नरेश गडेकर यांचे होते तर निर्माती म्हणून आसावरी तिडके यांनी सूत्रे स्वीकारली होती. प्रफुल्ल फरकसे हे या नाटकाचे प्रमुख सूत्रधार होते.
निरागस कुटुंबाच्या भोवती नाटकाचे कथानक गुंफले आहे. गोविंदा (राजेश चिटणीस) हा प्रसिद्ध रंगकर्मी आहे तर त्याची पत्नी गोपिका (आसावरी तिडके) ही गृहिणी आहे. गोविंदाचे वडील व्यंकटेश (देवेंद्र लुटे) हे लकव्याने पीडित आहेत. त्यांना स्मृतिभ्रंश जडलेला आहे. गोविंदा व गोपिकाची मुलगी स्वरा (मुग्धा देशकर) पुण्यात शिकायला आहे. सर्व गुण्यागोविंदाने सुरू असताना देशात कोरोनाचे आक्रमण होते आणि पंतप्रधानांनी टाळेबंदी जाहीर केली आहे. या टाळेबंदीत जमिनीच्या कागदपत्रांवर गोपिकाची स्वाक्षरी घेण्यासाठी आलेले तिचे काका वामनराव (नरेश गडेकर) अडकले आहेत. या सगळ्या घडामोडीतील चटकपटक संवादातून झालेली विनोदनिर्मिती तुफान आहे. गोविंदा अन् गोपिकाच्या प्रणयलीलेत अडसर ठरलेले वृद्ध व्यंकटेश व वामनराव अनेक प्रसंगातून प्रत्येकाला त्यांच्या घरातील टाळेबंदीच्या काळातील आठवणी जाग्या करतात. दरम्यान, स्वराला कुणाचेही न ऐकल्याने सहलीला गेल्याने कोरोना होतो. त्यानंतर वेदना, संवेदनेच्या पातळीवर आनंदी समारोप होतो, असे हे नाटक आहे. नाटकातील चारही पात्रे हे अभिनय क्षेत्रातील हुकमी एक्के आहेत आणि त्यांच्या विनोदाचा टायमिंग जोरदार आहे, हे रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता आले.
तत्पूर्वी श्रीमय ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका दीपाली तुमाने, मनपा स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, अ.भा. मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, माजी अध्यक्ष प्रमोद भुसारी, नाट्यसमीक्षक प्रकाश एदलाबादकर, फिल्म फोटोग्राफर विनोद देशपांडे, संगीतकार चारुदत्त जिचकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाटकाचे नेपथ्य प्रकाश पात्रीकर, प्रकाशयोजना विशाल यादव, गीत-संगीत वीरेंद्र लाटणकर, गायन श्रुती चौधरी व राजेश चिटणीस, निवेदन मोहन जोशी, पार्श्वसंगीत अभिषेक बेल्लारवार, रंगभूषा बाबा खिरेकर, वेशभूषा यशश्री मुळे, तंत्रव्यवस्थापन चिन्मय देशकर, नृत्यदिग्दर्शन लोकेश तांदूळकर तर रंगमंच व्यवस्था पारस फुले, गजानन जैस, स्वराज बावनकर, मिलिंद चव्हाण, रोशन झाडे यांचे होते. श्री संत गुलाबबाबा आश्रम व हेमेंदू रंगभूमी यांचे विशेष सहकार्य लाभले.
.......