वाईन शॉपसह १४ प्रतिष्ठानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:27+5:302021-03-01T04:08:27+5:30
- १०६ मंगल कार्यालये, लॉनची तपासणी : -मनपा पथकांनी वसूल केला १.४५ लाखाचा दंड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
- १०६ मंगल कार्यालये, लॉनची तपासणी : -मनपा पथकांनी वसूल केला १.४५ लाखाचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुसऱ्या दिवशी रविवारी वाईन शॉपसह काही प्रतिष्ठाने उघडी होती. अशा १४ प्रतिष्ठांनावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करून १ लाख ४५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.
शहरात कोरोनाची व्याप्ती वाढत असल्याने महापालिकेकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. कोविड नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी मनपा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठानांवर मनपाच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनमध्ये १, धरमपेठ झोनमध्ये ५, गांधीबाग व सतरंजीपुरा प्रत्येकी ३ तर आशीनगर व मंगळवारी झोनमध्ये प्रत्येकी एकावर कारवाई करण्यात आली. पथकाकडून शहरातील महापालिकेच्या सर्व झोनमधील १०६ मंगल कार्यालये, लॉनची पाहणी करण्यात आली. रविवारीदेखील पथकांची सर्वत्र नजर होती. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रतिष्ठाने बंद होती.
.........
कारवाई झालेली प्रतिष्ठाने
लक्ष्मीनगर झोनमधील वंदना वाईन शॉप, धरमपेठ झोनमधील सदर येथील सन फ्लॅक्स स्टील प्रा.लि., धरमपेठ झेंडा चौकातील आयसीआयसीआय होम फायनान्स, आवास फायनान्स, सीताबर्डी येथील आनंद बेकरी, रामनगर चौकातील जय लक्ष्मी मिष्ठान्न भांडार, गांधीबाग झोनमधील फिश मार्केट येथील पॉप्युलर एजन्सी, भालदारपुरा येथील एस.एम. फार्मसी, भावे सत्यपाली मेडिसीन, सतरंजीपुरा झोनमधील भारतमाता चौकातील मोतीलाल जयस्वाल वाईन शॉप, मस्कासाथ इतवारी येथील बी.एम. ट्रेडर्स, पाचपावली येथील मारुती लोंढे, आशीनगर झोनमधील कमाल चौकातील शेर-ए-पंजाब हॉटेल, तसेच मंगळवारी झोनमधील सदर भागातील क्रिष्णा कन्सलटंट आदींवर कारवाई करून १ लाख ४१ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.