नागपूर : मंगल कार्यालय, लॉन, सभागृहात आयोजित कार्यक्रमांना हजारोंची गर्दी होत असून, ही ठिकाणे आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागली आहेत. मंगळवारी अशा ८ सभागृहांवर कारवाई करून ३२ हजारांचा दंड आकारण्यात आला. अशा स्वरूपाची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
शोध पथकांनी मंगळवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील चार मंगल कार्यालये, धरमपेठ झोनमध्ये दोन, नेहरूनगर झोन व सतरंजीपुरा झोनमध्ये प्रत्येकी एका मंगल कार्यालयावर कारवाई करून दंड आकारण्यात आला.
लक्ष्मीनगर झोनचे उपद्रव शोध पथकाचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनमध्ये धर्मराज कटरे, नेहरूनगर झोनमध्ये नत्थू खांडेकर, सतरंजीपुरा झोनमध्ये प्रेमदास तरवटकर यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. या झोनमधील पराते सभागृह, राधे मंगलम सभागृह, गोल्डन लीफ लॉन, साईबाबा सभागृह येथे २०० हून अधिक नागरिक विवाह सभारंभात आढळून आले. त्यांना प्रत्येकी ५ हजार दंड आकारण्यात आला.
धरमपेठ झोनमधील कुसुमताई वानखेडे सभागृह, नेहरूनगर झोनमधील जट्टेवार मंगल कार्यालय व सतरंजीपुरा झोनमधील प्रीतम सभागृहाला दंड आकारण्यात आला. धरमपेठ झोन क्षेत्रातील रामदासपेठ येथील मातृ मंगल कार्यालयात गर्दी नव्हती
हॉटस्पॉट भागात स्क्रिनिंग सुरू
- शहरात कोविडचे नवीन ९ हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत. यात खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बिडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर आदींचा समावेश आहे. या परिसरात मनपातर्फे तपासणी व स्क्रिनिंग सुरू करण्यात आली आहे.
दुकानदारावरही होणार कारवाई
- मंगल कार्यालयानंतर मनपा बाजारात होणारी गर्दी नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी नियोजन केले आहे. दुकानात सुरक्षित अंतर व मास्कचा वापर न केल्यास दंड आकारला जाणार आहे, तसेच सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी झोन स्तरावर जबाबदारी दिली जात आहे. लवकरच कारवाई केली जाणार आहे. मनपा आयुक्तांनी व्यापाऱ्यांना अॅक्शन प्लान मागतिला होता.