लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मकरसंक्रांत आली की पतंग उडविण्यासाठी चढाओढ सुरू होते. परंतु मागील काही वर्षांत यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. यामुळे आजवर अनेकांचे बळी गेले. सोबतच दरवर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी जखमी होतात. याचा विचार करता मनपाच्या उपद्रव शोध पथकाने नायलॉन मांजा व प्लास्टिक पतंग विकणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी तीन झोनमधील पाच विक्रेत्यांवर कारवाई करून पाच हजाराचा दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत एक, सतरंजीपुरा झोनअंतर्गत दोन आणि आशीनगर झोन क्षेत्रात दोन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. २२५ प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आल्या.
शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली असतानाही या मांजाचा सर्रास वापर केला जातो. या मांजामुळे अनेकांनी आपला जीव गमवाला आहे. जखमींपैकी काहींना गळ्याला इजा झाल्याने आजही नीट बोलता येत नाही. काहींची दृष्टी गेली आहे. असे धोके असूनही मकरसंक्रांतीच्या कालावधीत नायलॉन मांजाचा वापर केला जातो.
बंदी असलेला मांजा नागपूर शहरात येतो कुठून, तो वापरणारे कुठून आणतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा पुरवठादारांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.
नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही कारवाई व्हावी
नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. सोबतच या मांजाचा वापर करून पतंग उडवतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. नायलॉनचा मांजा वापरणाऱ्या पतंग शौकिनांवर कारवाई झाली तर त्यांच्यात धाक निर्माण होईल.