लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा उद्योगजगताचा दृष्टिकोन बदलेल अशी चर्चा आहे. मात्र या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्र शासन तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.सोमवारी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. अंतिम वर्षाच्या परीक्षांवर बरेच आरोप झाले. परीक्षा घेणारच नाही असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. केवळ आताची स्थिती लक्षात घेता सध्या पदवी देऊ व ज्यांना गुणसुधार करायचा आहे, त्यांची नंतर परीक्षा घेऊन अशी आमची भूमिका होती. मी परीक्षा न घेण्याच्या माझ्या मतावर आजही ठाम आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे हे कर्तव्यच असून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे सामंत यांनी सांगितले. आयआयटीसह देशातील इतर राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या, तेव्हा ओरड का झाली नाही, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.आम्ही तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेचे निकाल आल्यानंतर तेथील प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. सध्याची स्थिती पाहता शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरू होईल हे सांगता येत नाही, असे सामंत यांनी प्रतिपादन केले.नागपूर विद्यापीठात ७५ हजारांहून अधिक परीक्षार्थीनागपूर विद्यापीठात एमसीक्यू करायची की नाही अशी शंका होती. मात्र आता परीक्षेचे काम वेगाने सुरू आहे. मॉक टेस्ट घेतल्या जात आहे. नियमित व अनुत्तीर्ण मिळून ७५ हजार ९२५ विद्यार्थी १ हजार ८८२ विषयांच्या परीक्षा देणार आहेत. त्यातील ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सज्ज असून उर्वरित विद्यार्थ्यांचीदेखील सोय करण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.अनुत्तीर्णांची दीड महिन्यात परीक्षाएखादा पेपर द्यायचा राहिला तर कसे होणार अशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती. मात्र अशा विद्यार्थ्यांची १५ दिवसांनी परत परीक्षा घेण्यात येईल. शिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षादेखील महिना दीड महिन्यात होईल, असे उच्च शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.आठ दिवसात सर्व विद्यापीठांचा दौराकोरोना काळात मी दौरा का करतो आहे याबाबत अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र राज्यातील विद्यापीठे प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा घेत आहेत. शासन या सर्व विद्यापीठांच्या पाठीशी आहे. यासाठीच मी नागपूर व गडचिरोलीचा दौरा केला. पुढील आठ दिवसांत सर्व विद्यापीठांचा दौरा करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.कोरोना संपल्यानंतर भरती प्रक्रियाकोरोनामुळे राज्यभरातील विद्यापीठांतील भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. मात्र शासनाने भरती नेहमीसाठी थांबविलेली नाही. कोरोनाचा प्रकोप संपल्यानंतर परत भरती प्रक्रिया सुरू होईल, असा दावा सामंत यांनी केला.
पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कंपन्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:16 PM