Coronavirus in Nagpur; अंतिम संस्कारासाठी लाकडाचे पैसे घेतल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 10:05 AM2021-05-04T10:05:34+5:302021-05-04T10:06:40+5:30
Coronavirus in Nagpur जर मनपाच्या घाटांवर कोरोनाबाधित मृतदेहाच्या दहनाकरिता लाकडांसाठी पैसे मागण्यात येत असल्यास त्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाच्या सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडे पुरविण्याचा महापालिकेने घेतला आहे. यानंतरही जर मनपाच्या घाटांवर कोरोनाबाधित मृतदेहाच्या दहनाकरिता लाकडांसाठी पैसे मागण्यात येत असल्यास त्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिला आहे.
मनपाच्या सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या दहन घाटांव्यतिरिक्त सर्व घाटांवर नि:शुल्क लाकूड उपलब्ध करण्यात येत होते. कोरोनाच्या या परिस्थितीत कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी या सहाही घाटांवर नि:शुल्क लाकडांचा पुरवठा करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता सर्व घाटांवर कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून दिले जातात. शिवाय अन्य मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिकेट्स नि:शुल्क देण्यात येतात.मात्र यासंबंधी नागरिकांमध्ये अनेक संभ्रम दिसून येतात. शिवाय दहन घाटांवर काही लोक शुल्क घेत असल्याचे सुद्धा दिसून येत आहेत. यासंबंधी तातडीने कार्यवाही करून दहन घाटांच्या दर्शनी भागावर नि:शुल्क लाकडांच्या पुरवठ्याबाबत मनपाच्या आदेशाचे फलक लावण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय सेवा आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांनी सोमवारी ऑनलाइन बैठकीत दिले.
प्रदीप दासरवार यांच्यासह वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे
कोविड या संकटाच्या स्थितीमध्ये मनपाचे आरोग्य कर्मचारी दहन घाटांवर अविरत सेवा देत आहेत. सर्व घाटांवरील व्यवस्था हाताळण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे येउन मनपाकडे आपली नावे सादर करावी, असे आवाहन आरोग्य समिती सभापतींनी केले आहे.