नागपुरात रेती तस्करांना चाप : तीन ट्रक पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 08:51 PM2020-06-05T20:51:19+5:302020-06-05T20:52:48+5:30
अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे. महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस विभागातील काही भ्रष्टाचारी यांच्याशी संगनमत करून रेती माफिया नियमित कोट्यवधीची रेती तस्करी करतात. गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात हा गोरखधंदा सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी प्रचंड प्रमाणात रेतीचे साठे जप्त करून वाळू माफियांना दणका दिला होता. त्यामुळे काही दिवस रेती तस्कर शांत बसले. नंतर मात्र पुन्हा जैसे थे सुरू झाले. लॉकडाऊन असूनही रेती माफियांची वाहने बिनबोभाट रेतीचे ट्रक घेऊन जात असल्याचे रात्री-बेरात्री दिसते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रेती माफिया अधिकच निर्ढावले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू केली आहे. ही माहिती कळताच वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांनी आज भल्या सकाळी दिघोरी नाक्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने वाहनांना पकडण्याची मोहीम सुरू केली. कारवाईत रेतीने भरलेले तीन टिप्पर पोलिसांच्या हाती लागले. प्रत्येक टिप्परमध्ये पाच ब्रास अशी एकूण १५ ब्रास रेती आहे. तिची किंमत सव्वा ते दीड लाख रुपये असून टिप्परची किंमत धरून एकूण मुद्देमाल ५० लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई झाल्याचे कळताच मागून येणारी सर्व रेतीने भरलेली वाहने माफियांनी दुसऱ्या मार्गाने शहराबाहेर नेली.
३० वाहनांवर कारवाई
जड वाहनांना शहरात वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीसुद्धा अनेक जड वाहने बिनधास्त शहरात फिरतात. अशा ३० वाहनांना वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले.