लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे वाढत असलेले तापमान पाहता शालेय विद्यार्थी उष्माघाताने बळी पडू नयेत म्हणून दुपारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत अतिशय कडक असून हे आदेश न पाळणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिक्षणाधिकाऱ्यांना शाळांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रवींद्र खजांजी यानी दिले आहेत.उन्हाचा पारा ४५ वर पोहचला आहे. सकाळपासूनच ऊन जाणवायला लागले आहे. शरीर भाजणाऱ्या या उन्हामुळे प्रत्येक जीव होरपळत आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. तेव्हा शालेय विद्यार्थी उष्माघाताचे बळी पडू नयेत म्हणून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.हवामान खात्याने विदर्भात उन्हाळा अधिक तापणार असून, येणाऱ्या दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम आरोग्यावर पडण्याचे संकेत दिले आहेत. तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू शकतो. या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी व्यक्त करीत मे महिन्यात सर्व शासकीय, अशासकीय, खासगी शाळा व विद्यालये बंद ठेवण्यात याव्यात. तसेच अतिरिक्त वर्ग घ्यायचे असल्यास ते सकाळच्या सत्रात घ्यावे. सकाळी ११ वाजेपर्यंतच शाळा महाविद्यालये सुरु ठेवावेत, असे आदेश दिले. सीबीएसई व आयसीएसई शाळांच्या प्राचार्यांना सुद्धा यासंंबधीचे आदेश जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ज्या शाळा व महाविद्यालये या आदेशाचे काटेकोर पालन करणार नाहीत, त्यांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश निवासी उपजजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.कारवाई होणारशालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात त्रास होऊ नये, त्यामुळे उन्हात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची अवहेलना करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार होत असेल तर अशा शाळांविरुद्ध निश्चितच कारवाई केली जाईल.रवींद्र खजांजीनिवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीशिक्षणाधिकाऱ्यांनी उन्हाळी सुट्या केल्या जाहीरशाळा महाविद्यालयांना येत्या १३ मे पासून उन्हाळी सुट्या लागणार होत्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानंतर जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. एस.एन. पटवे यांनी गुरुवार (२ मे पासूनच) उन्हाळी सुट्या जाहीर केल्या असून त्या २५ जूनपर्यंत राहतील. तसे आदेश त्यांनी जारी केले असून ते सर्व राज्य मंडळ मान्यता प्राप्त सीबीएसई, आयसीएसईच्या सर्व व्यवस्थापनाच्या खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू आहेत. २ मे ते १२ मे मधील सुट्या या पुढील प्रदीर्घ सुट्यांमध्ये समायोजित करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.या शाळांना विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे नाही का?जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही काही शाळांनी विशेषत: खासगी शाळांनी त्याचे पालन न केल्याची माहिती आहे. उद्या या विद्यार्थ्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी शाळा घणार आहे का, असा संतप्त सवाल काही पालकांनी लोकमत कार्यालयात फोन करून केला आहे.