नागपुरात धान्य, मास्क आणि खाद्यतेलाचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:42 AM2020-04-04T00:42:27+5:302020-04-04T00:43:47+5:30
मास्क आणि सॅनिटायझरची जास्त दरात विक्री करणारे दोन फार्मासिस्ट आणि सुपर बाजारच्या संचालकावर अधिकाऱ्यांनी कारवाई करून ५ हजाराचा दंड ठोठावला तर वापरलेल्या डब्यात पुन्हा तेल भरून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर धाड टाकाून १.१६ लाख रुपयांचे सोयाबीन तेल जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. पण काही व्यापारी प्रशासनाच्या प्रयत्नाला हरताळ फासत आहेत. अशातच मास्क आणि सॅनिटायझरची जास्त दरात विक्री करणारे दोन फार्मासिस्ट आणि सुपर बाजारच्या संचालकावर अधिकाऱ्यांनी कारवाई करून ५ हजाराचा दंड ठोठावला तर वापरलेल्या डब्यात पुन्हा तेल भरून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर धाड टाकाून १.१६ लाख रुपयांचे सोयाबीन तेल जप्त केले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, ग्राहक संरक्षण विभाग आणि नागपूर शहर पोलीस या पाच शासकीय यंत्रणाच्या संयुक्त भरारी पथकाने शुक्रवारी केली. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू, धान्याचा काळाबाजार, साठेबाजी होऊ नये तसेच वाढीव दराने विक्री होऊ नये व त्यावर आळा बसावा, याकरिता संयुक्त पथक स्थापन केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वात नागपूर शहरातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य अशी पाच पथके तयार करण्यात आली असून या पथकांकडून अशा विक्रेत्यांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे.
दत्तवाडीत दोन मेडिकल स्टोअर्सवर प्रत्येकी पाच हजारांचा दंड
दुप्पट भावाने मास्क विक्री करणाऱ्या दत्तवाडी येथील दोन मेडिकल स्टोर्सवर वैधमापनशास्त्र विभाग व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धाड टाकून कारवाई केली. शासनाच्या नियमानुसार उत्पादन शुल्कातच मास्कची विक्री करणे अनिवार्य असताना औषध विक्रेते दुप्पट भावात मास्क विक्री करीत होते. जयलक्ष्मी आणि चिंतामणी अशी फार्मसीची नावे आहेत. फार्मसीत १६ रुपये किमतीचा प्लाय मास्क ३० रुपयात विकण्यात येत होता. चिंतामणी फार्मसीत १९ मास्क होते. दोन्ही मेडिकल स्टोअर्सवर प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुख्तार दाऊद शेख, वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक विजय धोटे, उमेश गौर, गुन्हे शाखेचे एपीआय संकेत चौधरी, एएसआय वसंता चवरे, प्रकाश वानखेडे, राहुल इंगोले, मंगेश मडावी, अरुण चंदणे, शत्रुघ्न कडू, नीलेश वाडेकर, नरेश सहारे यांनी केली.
पूनम बाजारमध्ये हॅण्ड सॅनिटायझरची जास्त दरात विक्री
अलंकार टॉकीजसमोरील पूनम बाजार हॅण्ड सॅनिटायझर ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त दरात विक्री होत असल्याच्या माहितीवरून अन्न पुरवठा अधिकारी, वैधमापनशास्त्र निरीक्षक, पोलीस निरीक्षक ताकसांडे, सहायक पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी आणि कर्मचाऱ्यांनी पूनम बाजारात कारवाई केली. या ठिकाणी अल्केय कंपनीचे सॅनिटायझर ८० रुपये मूळ किमतीपेक्षा १४० रुपयांचे टॅग लावून वाढीव दराने विक्री करताना आढळून आले. अत्यावश्यक सेवा अधिनियमाचे उल्लंघन केल्याबाबत परिमंडळ अधिकारी निनाद लांडे, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, धंतोली झोन यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१.१६ लाखांचे खाद्यतेलाचे ६५ डबे जप्त
भरारी पथकाने मिरची बाजार, नेहरू पुतळा, इतवारी येथील जेठानंद अॅण्ड कंपनी या फर्मवर अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार आणि अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयम व विनोद धवड यांनी संयुक्त कारवाई केली. परवान्याची मुदत संपल्यानंतरही व्यापारी व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. याशिवाय उपयोगात आणण्यात आलेले डबे (टीन) पुन्हा तेल भरण्यासाठी वापर करीत असल्याचे दिसून आले. तसेच खाद्यतेलाची गुणवत्ता आणि दर्जा निकृष्ट असल्याने अधिकाऱ्यांनी १ लाख १६ हजार ६१६ रुपये किमतीचे ६५ रिफाईन सोयाबीन तेलाचे डबे जप्त केले.
जीवनावश्यक वस्तू, धान्याचा काळाबाजार, साठेबाजी तसेच धान्याची वाढीव दराने विक्री होत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६०२१४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.