रेल्वेतील ‘खाद्य सेवा’ सुधारण्यावर प्रशासनाचे लक्ष; अनधिकृत वेंडर्सना दणका; ६ कोटींचा दंड वसूल
By नरेश डोंगरे | Published: December 1, 2024 10:24 PM2024-12-01T22:24:47+5:302024-12-01T22:30:05+5:30
८ महिन्यात रेल्वेने विविध ठिकाणी कारवाई करून अनेक वेंडरर्सना दणका दिला आहे
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: प्रवाशांच्या आरोग्याला हानी पोहचवू पाहणाऱ्या रेल्वेतील अनधिकृत खाद्यविक्रेत्यांवर मध्य रेल्वे प्रशासनाने खास नजर रोखली आहे. या पार्श्वभूमीवर, ८ महिन्यात रेल्वेने विविध ठिकाणी कारवाई करून अनेक वेंडरर्सना दणका दिला आहे. त्यांना मोठा दंडही ठोठावला आहे.
बल्लारशाह नागपूरमार्गे दिल्लीकडे निघालेल्या रेल्वेगाडीत खाद्यपदार्थ खाल्याने अनेक प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाने केेवळ नागपूर विभागाच नव्हे तर संपूर्ण रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर हे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आणि त्याचे पार्सल तयार करून विकणाऱ्या बल्लारशाह रेल्वे स्थानकापासून तो नागपूर रेल्वे स्थानकापर्यंतच्या खाद्यपदार्थ विकणारांची चाैकशी झाली. दोषींवर कारवाईदेखील झाली. मात्र, थेट दिल्लीतूनच या संबंधाने कडक निर्देश मिळाल्याने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी रेल्वे गाड्या आणि रेल्वेस्थानकांवर अनधिकृतपणे खाण्यापिण्याचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण तयार केले होते.
त्यानंतर ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर छापे मारण्यात आले. १४० खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे तपासण्या करण्यात आल्या. अनेक गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे, चहा-कॉफीचे नमूने घेण्यात आले. दोषी आढळलेल्या सातशेंवर विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून नोव्हेंबर २०२४ या एका महिन्यात ४९.०१ लाखांचा दंड वसूल केला. तर, एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ६ कोटी, ३९ लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाई आणि दंडाचे प्रमाण १६.७७ टक्के जास्त आहे. या कारवाईच्या दणक्यामुळे रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्यांची संख्या कमी होऊन प्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याचा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.
वेंडर व्यवस्थापन प्रणाली
रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विकणारांनी शिरू नये म्हणून प्रशासनाने वेंडर व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. त्यानुसार, नागपूर विभागातील खाद्यविक्रेत्यांसाठी ८३५ विक्रेत्यांना विशिष्ट ओळखपत्र देण्यात आले आहे. मोबाईल अँपवर या सर्वांना कनेक्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक किंवा गाड्यांमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारा व्यक्ती अधिकृत की अनधिकृत ते लगेच स्पष्ट होणार आहे.