लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण वाढत असतानाच्या काळात गरिबांना दोन वेळचे अन्न मिळावे, यासाठी नि:शुल्क शिवभोजनचा उपक्रम सरकारने सुरू केला आहे. यासाठी आवश्यकता असलेल्या ठिकाणी नव्या केंद्रांची निर्मिती करण्याच्या संदर्भातही सूचना आहे. यासंदर्भात शासनाकडून केंद्रांची यादी आली असली तरी अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
मागील लॉकडाऊनपेक्षाही या वेळच्या लॉकडाऊनची स्थिती गंभीर आहे. कोरोना संक्रमणामुळे कामकाज मोठ्या प्रमाणावर ठप्प पडले आहे. अनेक लहान मोठे व्यवसाय बंद पडल्याने उत्पन्नाचे साधन हिरावले आहे. हातावर आणून खाणाऱ्या वर्गाचे हाल सुरू आहेत. शहरात सध्या असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. नव्या केंद्रांच्या ठिकाणांची यादीही तयार आहे. यासंदर्भात रविवारी सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्याशी संपर्क साधला असता नवीन शिवभोजन केंद्रांसाठी यादी आली आहे. सोमवारी ती कार्यालयात उपलब्ध होईल, असे सांगितले. नवे केंद्र सुरू करण्याची प्रकिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते. भोजन ही प्राथमिकता असल्याने शासनाने नवीन यादी तातडीने मंजूर केली आहे. असे असतानाही केंद्रांची अंमलबजावणी करण्यासाठी विलंब का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
...
योजनेची वैशिष्ट्ये
- १० रुपयात शिवभाेजन थाळी ही योजना २६ जानेवारी २०२० रोजी सुरू करण्यात आली होती.
- मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली होती.
- एप्रिल २०२१ मध्ये कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनच्या काळात पार्सल रूपात थाळी नि:शुल्क केली.
- सध्या उपराजधानी नागपुरात शिवभोजनची १० केंद्र आहेत. यातील सुमारे अडीच हजार लाभार्थी भोजन घेतात. याशिवाय काही ठिकाणी नव्या केंद्रांच्या स्थापनेची गरज आहे.