दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोलने भरलेल्या वॅगन, कोळशाच्या मालगाड्या रेल्वेस्थानकावर उभ्या राहतात. अचानक आग लागल्यास अख्खे रेल्वेस्थानक खाक होण्याची भीती राहते. आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासन अग्निशमन विभागाला पाचारण करते. परंतु मदत पोहोचण्यास उशीर लागल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. रेल्वेस्थानकावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्यामुळे अचानक आग लागल्यास ती विझविणार कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दोन महिन्यापूर्वी नागपूर रेल्वेस्थानकाच्या लूप लाईनवर उभ्या असलेल्या पेट्रोलने भरलेल्या वॅगनला आग लागली होती. वेळीच आग लागल्याचे लक्षात आल्यामुळे नियंत्रण मिळविण्यात यश आले. अन्यथा अख्खे रेल्वेस्थानक आणि आजूबाजूचा परिसर खाक झाला असता. भारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून रेल्वेत लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग अस्तित्वात होता.हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच हा विभाग घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणत होता. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले तेव्हापासून आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी रेल्वेत स्वतंत्र विभागच अस्तित्वात नाही.देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी आग लागल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता राहते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
अख्खे रेल्वेस्थानक खाक होण्याची भीतीनागपूर रेल्वेस्थानकावर अनेकदा पेट्रोलने भरलेल्या मालगाड्या उभ्या राहतात. एखाद्या प्रसंगी शॉटसर्किटमुळे आग लागल्यास आणि या पेट्रोलच्या मोठमोठ्या बंबांनी पेट घेतल्यास अख्खे रेल्वेस्थानकच जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोलच्या बंबासह अनेकदा दगडी कोळशाने भरलेल्या मालगाड्याही रेल्वेस्थानकावर उभ्या राहतात. त्यामुळे आग लागल्यास प्लॅटफार्मवर आग विझविण्यासाठी कुठलेच उपकरण नसल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
अग्निशमन विभाग हा धोरणात्मक निर्णय‘रेल्वेत स्वतंत्र अग्निशमन विभाग सुरु करावा की नाही हा धोरणात्मक निर्णय आहे. रेल्वे बोर्डाच्या पातळीवर हा निर्णय घेतला जातो. स्थानिक पातळीवर याबाबत काहीच निर्णय घेणे शक्य नाही.’-सोमेश कुमार, ‘डीआरएम’ मध्य रेल्वे, नागपूर विभाग
प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणे गरजेचेरेल्वेस्थानकावर अचानक आग लागल्यास महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. त्यामुळे रेल्वेने आपला अग्निशमन विभाग सुरू करून प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.- बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र.