Satish Ukey : कोट्यवधींच्या जमीन फसवणूक प्रकरणी उके बंधूंना न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 04:55 PM2022-10-20T16:55:09+5:302022-10-20T17:43:33+5:30
बुधवारी पोलिसांनी उके बंधूंना न्यायालयात हजर केले
नागपूर : मागील सात महिन्यांपासून ईडीच्या कस्टडीत असलेल्या वकील सतीश व प्रदीप उके या बंधूंना बुधवारी नागपुरात आणण्यात आले. कोट्यवधीच्या जमीन फसवणूक प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यांना पोलीस कोठडी मिळू शकली नाही. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
अजनी येथील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, उके बंधू आणि त्यांच्या साथीदारांनी तिच्या पतीसोबत जमीन खरेदी करण्याचा सौदा केला होता. या कराराच्या बदल्यात ११ लाख रुपये देण्यात आले. यादरम्यान महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर उके बंधू आपल्या साथीदारांसह तिच्या घरात शिरले व पिस्तूलच्या धाकावर महिलेसोबत असभ्य वर्तन केले. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला.
जानेवारी महिन्यात महिलेने अजनी पोलीस ठाण्यात उके बंधू आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक, छेडछाड, धमकी देणे आणि शस्त्र विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच ईडीने कारवाई केली. ईडीने मुंबईत गुन्हा दाखल करून नागपुरातून दोघांनाही अटक केली. ईडीची कोठडी संपल्यानंतर उके बंधूंची मुंबई कारागृहात रवानगी करण्यात आली. अजनी येथील महिलेच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात उके बंधूंनी जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने तो फेटाळताच पोलिसांचे पथक प्रॉडक्शन वॉरंटसह मुंबईला रवाना झाले.
बुधवारी पोलिसांनी उके बंधूंना न्यायालयात हजर केले. महिलेच्या पतीसोबत झालेल्या करारावर केवळ साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नाव आणि पत्ता टाकलेला नाही. त्यामुळे साक्षीदारांचा शोध घ्यावा लागेल. तसेच प्रदीपने पिस्तूल कुठून आणले, कोणी दिले, याचा शोध घ्यायचा आहे. मार्च २००८ मध्ये देखील तक्रारकर्त्या महिलेला उके बंधूंनी पाच साथीदारांसह बंदूक दाखविली होती. त्या साथीदारांचा शोध घ्यायचा असून गुन्ह्यात उके बंधूंनी वापरलेले वाहन जप्त करायचे आहे अशी भूमिका मांडत पोलिसांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची विनंती फेटाळून लावत उके बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.