अठरा वर्षांनंतर महाविद्यालयांना मिळणार स्वायत्तता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:40 PM2018-02-07T18:40:50+5:302018-02-07T18:41:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १८ वर्षानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सोबतच स्वायत्ततेसाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांना अर्ज करणेदेखील सोपे होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने १८ वर्षानंतर महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नवीन महाविद्यालयांना स्वायतत्ता देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सोबतच स्वायत्ततेसाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांना अर्ज करणेदेखील सोपे होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाच्या अधिष्ठाता समितीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने स्वायत्त महाविद्यालये व स्वायत्ततेसाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांसाठी नियमांबाबतीत चर्चा झाली. शिवाय जुन्या दिशानिर्देशांचीदेखील समीक्षा करण्यात आली. मानव्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकांत कोमावार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित करण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, जुने अधिनियम, दिशानिर्देश व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांचे अध्ययन करून या समितीला नवीन दिशानिर्देशांचा आराखडा तयार करायचा आहे.
स्वायत्त महाविद्यालयांसाठी असलेल्या दिशानिर्देशांमध्ये सुधारणा न झाल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. महाविद्यालयांनादेखील यासंदर्भात अडचण आहेच. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन दिशानिर्देश आल्यामुळे विद्यापीठाने यात बदल करण्याचा निर्णय घेतला.