निवडणुकांनंतर चौकीदार तुरुंगात जाईल : राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:43 PM2019-04-04T21:43:59+5:302019-04-05T00:16:14+5:30

राफेल करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च वाटाघाटी करत बोलणी करण्याची प्रक्रियाच नष्ट केली. लोकसभा निवडणुकांनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल. यात सहभागी असलेल्या चौकीदाराचीदेखील चौकशी होईल व चौकीदार तुरुंगात जातील, असे प्रतिपादन करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता इशाराच दिला. नागपुरात गुरुवारी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत त्यांनी मोदींसह केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला.

After the elections, the Chawkidar will go to jail: Rahul Gandhi | निवडणुकांनंतर चौकीदार तुरुंगात जाईल : राहुल गांधी

निवडणुकांनंतर चौकीदार तुरुंगात जाईल : राहुल गांधी

Next
ठळक मुद्देसत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ

योगेश पांडे/आनंद डेकाटे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राफेल करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च वाटाघाटी करत बोलणी करण्याची प्रक्रियाच नष्ट केली. लोकसभा निवडणुकांनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यात येईल. यात सहभागी असलेल्या चौकीदाराचीदेखील चौकशी होईल व चौकीदार तुरुंगात जातील, असे प्रतिपादन करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता इशाराच दिला. नागपुरात गुरुवारी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत त्यांनी मोदींसह केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला.
कस्तूरचंद पार्क येथे नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अ.भा.कॉंग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी आशिष दुवा, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पीरिपाचे अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, कॉंग्रेसच्या अखिल भारतीय अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत, माजी खासदार विलास मुत्तेमवार, गेव्ह आवारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, अनिस अहमद, अनिल देशमुख, रणजित देशमुख, आ.प्रकाश गजभिये, शहराध्यक्ष विकास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. राफेल घोटाळा कुणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी जे काही विचारायचे ते वरिष्ठांना विचारा असे म्हटले होते. मोदी यांनी कुठलाही अनुभव नसताना अंबानींना फायदा मिळवून दिला. अनुभव नसलेल्या विदर्भातील तरुण, शेतकऱ्यांना राफेलचे कंत्राट का दिले नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. मोदी यांनी मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. त्याचप्रमाणे संसद, विधीमंडळ व सरकारी नोकºयांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणदेखील देऊ, असेदेखील ते म्हणाले. यावेळी अ.भा.युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष केशवचंद्र यादव, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार आशिष देशमुख, अभिजित वंजारी हेदेखील उपस्थित होते.
असा आला ७२ हजारांचा आकडा
यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजनेचा ७२ हजारांचा आकडा कसा समोर आला ते सांगितले. आम्हाला मोदींसारखी खोटी आश्वासने द्यायची नव्हती. त्यामुळेच आम्ही काही महिन्यांअगोदर नामांकित अर्थतज्ज्ञांना विचारणा केली व अर्थव्यवस्थेला धक्का न लागता गरिबांना मदत कशी होईल, याचा आकडा काढण्यास सांगितले. त्यांनी सखोल अभ्यासानंतर आकडा काढला. पी. चिदंबरम यांनी मला तो आकडा सांगितला. आम्ही गरिबीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार आहोतच. अर्जुनासारखे माझे लक्ष्य ठरले आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीची प्रति महिना मिळकत किमान १२ हजार रुपये असलीच पाहिजे. पुढील पाच वर्षांत देशातील २० टक्के गरीब जनतेच्या बँक खात्यात ३ लाख ६० हजार रुपये जमा करुनच दाखवील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
मोदींचे वय झाले, मला लांबचे राजकारण करायचेय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय झाले आहे. त्यांना घाई आहे व त्यामुळेच ते विविध योजनांची नावे घेऊन खोटे बोलतात. मला मात्र कसलीही घाई नाही. मी देशात दोन-तीन दिवसांसाठी राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. मला जनतेसोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण करायचे आहे. पुढील १५-२० वर्षे मी जनतेसोबत असेल, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना चिमटा काढला.
हा आहे का मोदींचा हिंदू धर्म?
यावेळी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा दाखला देत राहुल गांधी यांनी मोदींच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला. अडवाणी हे मोदींचे गुरू होते. मात्र आता त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांच्या वाट्याला केवळ दुर्लभ व अपमान आला. आपल्या गुरूचा सन्मान करा, असे हिंदू धर्म सांगतो. मात्र अडवाणी यांची हेटाळणी करणाऱ्या मोदींचा हा हिंदू धर्म आहे का, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
चीनमध्ये दिसेल ‘मेड इन विदर्भ’
यावेळी राहुल गांधी यांनी विदर्भावरदेखील भाष्य केले. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे ‘हब’ बनवू इच्छित होतो. पण मागील पाच वर्षांत यांनी कामच केले नाही. पंतप्रधानांनी आणलेली ‘मेक इन इंडिया’ योजना चांगली होती. मात्र यामुळे काही मूठभर लोकांचाच फायदा झाला. विदर्भातील शेतकऱ्याचा माल थेट लंडन, अमेरिकेत विकला जावा, असे आमचे ‘व्हिजन’ आहे. आता जागोजागी ‘मेड इन चायना’ दिसते. मात्र भविष्यात चीनमध्ये ‘मेड इन विदर्भ’ दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले. सत्तेवर आलो तर वर्षभरात सरकारी विभागातील २२ लाख रिक्त पदे भरु, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.

पाच वर्षांत देशात सर्वाधिक बेरोजगारी : अशोक चव्हाण

देशात मागील ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारी गेल्या पाच वर्षांत वाढली. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. रस्त्यावर दूध,  भाजीपाला फेकत आहे, या देशाची इतकी वाईट अवस्था कधीच नव्हती जितकी गेल्या पाच वर्षांत झाली, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. 
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी कस्तूरचंद पार्कवर झालेल्या जाहीर सभेत  बोलताना खा. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले, परंतु काहीच मिळाले नाही.  शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी मागण्यांसाठी पदयात्रा काढत आहेत. देशाचे आणि महाराष्ट्राचे वाटोळे केलेल्या सरकारला पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपने सत्तेतून पैसा कमविला, आता पैशातून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘एकही भूल कमल का फूल’असे व्यापारी म्हणू लागले आहेत. लोकांचा मोदीपसून भ्रमनिरास झाला असून, राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून लोकांना पाहायचे आहे. ‘मजदुरी घटी, बेरोजगारी बढी, किसान मरा, जवान शहीद, युवक परेशान है क्योकी चौकीदारही चोर है...’ अशा ओळी म्हणत त्यांनी मोदींवर प्रहार केला. दाभोलकर-पानसरे प्रकरणात न्यायालयाने मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका काय? असा सवालही त्यांनी केला.   

मोदी हे देश लुटारूंचेचौकीदार : जोगेंद्र कवाडे 
 पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लुटून विदेशात पळून जाणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चौकसी यांचे, राफेलचा घोटाळा करणाऱ्या अंबानीचे आणि आरएसएसचे चौकीदार आहेत. चोरांनाही आता नवीन शब्द मिळाला आहे, तो म्हणजे चौकीदार होय. देशात जे गढूळ वातावरण निर्माण झाले आहे, त्याने देशातील विविध क्षेत्राला नासवून टाकले आहे. 

...तर संविधान राहणार नाही - मुकुल वासनिक 
  काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशावरील एक संकट आहे. त्यांचा संविधानावर विश्वास नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर त्यांचा विश्वास आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान घालवण्याचे काम ते करतील. नेहरू, पटेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आणण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी पाच वर्षे भूलथापा देऊन घालविली. हे सरकार हटवण्यासाठीच राहुल गांधी आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

 सौगंध मुझे अंबानी की, मै फाईल नही मिलने दुंगा  : छगन भूजबळ 
 माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावेळी नरेंद्र मोदी आणि सरकारला धारेवर धरले. मोदी यांची नक्कल करीत कविताही ऐकविल्या. ते म्हणाले, अच्छे दिन आने वाले है, असे सांगितले जात होते. आता कुणीच बोलत नाही.  मोदी म्हणायचे एक पेन जरी विकत घेतला तरी पक्के बिल मागा. त्यांना राफेलच्या बिलाविषयी विचारले तर बिथरून जातात,असे सांगत ‘सौगंध मुझे अंबानी की मै फाईल नही मिलने दुंगा’ या शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली.  

चव्हाण-दर्डा यांनी केले राहुल गांधी यांचे स्वागत
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहुल गांधी यांचे आगमन झाले असता काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक हे राहुल गांधी यांच्या सोबतच आले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, उमाकांत अग्नीहोत्री यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. यावेळी गांधी हे दर्डा यांना बाजूला घेऊन गेले आणि त्यांच्याशी काही वेळ एकांतात चर्चा केली.

Web Title: After the elections, the Chawkidar will go to jail: Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.