घरात शिरून तरुणावर गोळीबार, आरोपी चिऱ्याला दोन महिन्यांनंतर अखेर अटक
By योगेश पांडे | Published: April 24, 2024 02:52 PM2024-04-24T14:52:54+5:302024-04-24T15:01:17+5:30
Nagpur : उधारीच्या पैश्यातून झालेल्या वादातून घरात शिरून गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या घरात शिरून त्याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात वसीम उर्फ चिऱ्या अफझल शेख याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अगोदरच दोन आरोपींना अटक केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
मीर सैफ अली मीर अख्तर अली सय्यद (२६, लकडगंज) हे प्रॉपर्टी डिलर असून त्यांनी चिऱ्याकडून १ लाख रुपये उधार घेतले होते. २१ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास चिऱ्या त्याचे साथीदार मोहसिन खान उर्फ भुऱ्या, फैजान खान, मोहम्मद अलीम मोहम्मद शरीफ व नितीन पिल्ले उर्फ मन्ना यांच्यासोबत जबरदस्तीने मीर यांच्या घरात शिरला व त्यांना मारहाण केली. त्यानंतर चिऱ्याने पिस्तुल काढून आत्ता पैसे दे नाही तर जीवे मारतो असे म्हणत गोळी झाडली. मीर बाजुला सरकल्याने गोळी खांबाला लागली. त्यानंतर आरडाओरड झाल्याने आरोपी फरार झाले. मीर व त्यांचे कुटुंबीय धास्तीत असल्याने त्यांनी तक्रार केली नव्हती. अखेर २८ मार्च रोजी त्यांनी तक्रार केली व लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने पिल्ले व मोहसीन खान यांना अटक केली होती. मात्र चिऱ्या फरारच होता. गुन्हेशाखेच्या पथकाला खबऱ्यांच्या माध्यमातून तो शांतीनगर घाटाजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून दोन पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व मोबाईल जप्त करण्यात आला. त्याचे साथीदार विजय दिगंबर महाजन (४३, कळमेश्वर) व आरीफ लतीफ शेख (३९, कळमेश्वर) यांना कळमेश्वरमधून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून कारसह एकूण ५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही आरोपींना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, मधुकर काठोके, सतिश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोषसिंह ठाकूर, प्रवीण लांडे, दीपक लाकडे, जितेश रेड्डी, दीपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.