गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात गोजिरवाणे बाळ जन्माला आले. गरिबीच्या संसारातही या नव्या पाहुण्याचे केवढे कौतुक! पदरमोड करून गाठीशी बांधलेल्या पैशातून महंमदने मोठ्या कौतुकाने त्याच्या कानात सोन्याची बाळी घातली. चमकत्या बाळीसोबत बाळ आनंदाने घरात रांगताना उद्याच्या सुखाची चमक त्याच्या डोळ्यात पाहताना आईबाप रंगून जायचे. मात्र कोरोनाची काळी छाया गडद झाली. व्यवसाय बंद पडला. ठेकेदाराने पैसा बुडवला. अखेर महमंदने बाळाच्या कानातील सोन्याची बाळी विकली आणि कुटुंब घेऊन गावाकडे निघाला.ही आपबीती आहे उत्तर प्रदेशातील मेरठच्या महंमद शाहरुख याची. नागपूरजवळ विश्रांतीला थांबला असताना त्याची गाठ पडली. फक्त सात महिन्याची गोजिरवाणी आयशा परविन या बाळाला आणि आपल्या पत्नीला घेऊन तो एका जुन्या स्कूटरने गावाकडे निघाला आहे. १० वर्षांपूर्वी पोटापाण्यासाठी त्याने तामिळनाडूतील कुंभकोणम गाठले. गावापासून हे अंतर २,४९५ किलोमीटरचे! पण नशीब अजमावण्यासाठी तो या अनोळखी शहरात रमला. तिथे एका कबाडी ठेकेदाराकडे कॉम्प्यूटर स्ट्रॅबचा व्यवसाय सुरू केला. भाड्याने घर घेतले. सोबतीला गावाकडचे काही युवक आले. पोटापाण्याचे ठीक चालल्याने महंमदने लग्न केले. सात महिन्यांपूर्वी मुलगी झाली. आयशा परविन असे तिचे नाव ठेवले. मोठ्या कौतुकाने तिच्या कानात बाळी घातली. पतीपत्नीच्या डोळ्यात सुखाची स्वप्ने होती. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. ठेकेदारीमधील हे काम सुरू असतानाच मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. काम थांबले. ठेकेदाराकडे ३० हजार रुपये बाकी असतानाही त्याने पैसा दिलाच नाही. कोरोना सतत वाढत चाललेला. पैशाअभावी घरात खाण्यापिण्याचे वांधे चाललेले. अशा वेळी परक्या मुलखात राहून करणार तरी काय? जीवाचे बरेवाईट झाले तर मदतीला कोण येणार? हा विचार करून त्यांनी गाव गाठायचे ठरविले. पण हाताशी पैसा नव्हता. विकावे तर अंगावर दागिनाही नव्हता. अखेर बाळाच्या कानातील बाळी कामी आली. मोठ्या दु:खी अंत:करणाने त्यांनी ती विकली. हाती आलेल्या पैशातून प्रवासाची तयारी केली.७ मे रोजी ते सर्वजण स्कू टरने कुंभकोणम (तामिळनाडू) वरून निघाले आहेत. सोबत दानिश, साजिद, अफरम, वसीम हे सोबती आहेत. या सर्व सोबत्यांचीही अशीच व्यथा आहे. सर्वांचेच ठेकेदाराकडे ३० ते ४० हजार रुपये थकीत आहेत. मात्र त्याने पैसे देण्याचे नाकारल्याने जिंदगी बची तो लाखो पाये म्हणत या सर्वांनी गोरखपूरला परतण्याचा निश्चय केला. चार स्कूटरवरून त्यांचा प्रवास सुरू आहे. सात महिन्यांच्या बाळाला घेऊन रोज १५० किलोमीटरचा प्रवास करीत शाहरुखसह या सर्वांनी नागपूरपर्यंतचे सुमारे एक हजार किलोमीटरचे अंतर गाठले. पुन्हा दोन हजार किलोमीटर अंतर कापायचे आहे.बाळी राहील आठवणीतआयुष्याशी झुंजण्याच्या इराद्याने ते निघाले आहेत. पेट्रोलच्या खर्चासाठी बाळाची बाळी कामी आली. आपल्या कानातील बाळी आईबाबांच्या संकटात कामी आली, याचे या छोट्या बाळाला कसले आले भान? पण हे सांगताना शाहरुखचे डोळे मात्र पाणावले. आयुष्याची ही लढाई थांबल्यावर त्यांना आयुष्यभर आठवणीत राहणार आहे ती लहानग्या आयेशाच्या कानातील बाळीच!