मिहानमधील वाघापाठोपाठ आता दाभा परिसरात बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:54 AM2019-11-24T00:54:53+5:302019-11-24T00:56:47+5:30
मिहान परिसरात वाघ दिसल्याच्या घटनेची दहशत थोडी शांत होत नाही तोच आता दाभा परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री अमरावती रोडवर काही नागरिकांना बिबट्या धावताना दिसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरात वाघ दिसल्याच्या घटनेची दहशत थोडी शांत होत नाही तोच आता दाभा परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री अमरावती रोडवर काही नागरिकांना बिबट्या धावताना दिसला. त्यानंतर वनविभागाने तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अद्यापही मागमूस लागलेला नाही. वाघानंतर आता बिबट्याची दशहत पसरली आहे.
शुक्रवारच्या रात्री काही राजकीय पक्षांची मंडळी आपल्या वाहनामधून अमरावती मार्गावरून जात असताना दाभाकडे जाणाºया मार्गावर एक बिबट्या धावताना दिसला. या घटनेची माहिती त्यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी वनविभागाला ही माहिती दिली. पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून रात्रीच वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. वाहतुकीमुळे बिबट्या भरकटू नये यासाठी रात्री मार्गावर दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून वाहतूक रोखून धरण्यात आली. वनविभागाच्या पथकाने रात्री बऱ्याच उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र बिबट्या आढळला नाही.
शनिवारी सकाळी पुन्हा त्याच्या शोधासाठी पथक निघाले. मात्र त्याचे पगमार्क मिळू शकले नाही. वायुसेना आणि पीकेव्हीच्या अधिपत्याखाली असलेल्या या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झुुडपी जंगल वाढले आहे. यापूर्वीही या क्षेत्रामध्ये बिबट आणि अन्य वन्यप्राण्यांचा वावर आढळला आहे.
गोरेवाडा जंगलातून येऊ शकतो बिबट्या
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसराच्या अगदी जवळच गोरेवाडा जंगल आहे. त्या जंगलातून भटकलेला बिबट्या या भागात आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. ही दिशा लक्षात घेता वनविभागाने शनिवारी सायंकाळी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
वाघाचाही अद्याप पत्ता नाही
चार दिवसांपूर्वी मिहान परिसरात व त्यानंतर बुटीबोरीजवळच्या सुमठाणा गावाजवळ दिसलेल्या पट्टेदार वाघाचा ठावठिकाणाही अद्याप लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी वनविभागाने मोठ्या प्रमाणावर ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यात एकदा दिसल्यानंतर तो पुन्हा न दिसल्याने चिंता वाढली आहे. वाघाचे पगमार्क सुकळी आणि खडगा गावालगतच्या शेताजवळ आढळले होते. त्यानंतर मागील दोन दिवसात वाघ कुठेच आढळला नाही. वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा वाघ बुटीबोरीवरून बोर राखीव व्याघ्र प्रकल्पाकडे जाऊ शकतो. तो बोरकडे जाणार हे गृहित धरून या मार्गावरही कॅमेरे लावले आहेत. अद्याप तो कॅमेऱ्यात कैद व्हायचा आहे.