पुन्हा एका पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा चौकशीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:22 AM2020-11-26T04:22:09+5:302020-11-26T04:22:09+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ठगबाज विजय गुरनुलेच्या चीटिंग कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना फसविल्याचे उघड झाल्यामुळे सर्वत्र खळबळ ...

Again, a credit union financial scandal is on the verge of investigation | पुन्हा एका पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा चौकशीच्या उंबरठ्यावर

पुन्हा एका पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा चौकशीच्या उंबरठ्यावर

Next

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ठगबाज विजय गुरनुलेच्या चीटिंग कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना फसविल्याचे उघड झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असताना नागपुरातील पुन्हा एका पतसंस्थेविरुद्ध नागरिकांनी रक्कम अडवून ठेवण्याची ओरड चालविली आहे. या संबंधाने आज अनेक गुंतवणूकदारांनी पाचपावली पोलिस ठाण्यात धाव घेऊन मंजुश्री पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीची ओरड केली आहे. पाचपावलीच्या नाईक तलाव परिसरात असलेल्या या पतसंस्थेच्या पदाधिकारी आणि एजंट्सनी आम्हाला आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून हजार रुपये घेतले आणि आता १४ महिन्यांचा कालावधी होऊनही आमची रक्कम परत केली नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून रक्कम परत करण्यास पतसंस्थेचे पदाधिकारी टाळाटाळ करीत आहेत, असे गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे सांगितले आहे. विशेष म्हणजे या गुंतवणूकदारांनी पोलिसांवरही कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप लावला आहे. यापूर्वी आम्ही अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. उलट आमच्यातील काही जणांना खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप एका महिलेने पाचपावली पोलिसांवर लावला आहे. दरम्यान, तक्रारदारांची संख्या आणि रोष वाढत असल्याचे कळल्यामुळे परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी मंगळवारी दुपारी पाचपावली पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांनी पीडितांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले आणि पाचपावली पोलिसांकडेही या संबंधाने विचारणा केली. यापूर्वी आलेल्या तक्रारींवर पोलिसांनी कोणती भूमिका घेतली. याबाबतही त्यांनी पाचपावलीचे ठाणेदार किशोर नगराळे यांच्याकडे चौकशी केली असता यासंदर्भात संबंधित पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी करून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन उपायुक्त मतानी यांनी संतप्त गुंतवणूकदारांना शांत केले. या एकूणच प्रकारामुळे नागपुरातील पुन्हा एका पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा चौकशीच्या उंबरठ्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

----

डीडीआरकडे पत्र : उपायुक्त मतानी

मंजुश्री पतसंस्थेत खरेच घोटाळा झाला काय, ग्राहकांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी पदाधिकारी टाळाटाळ का करीत आहेत, पोलीस गुन्हा दाखल करणार काय, या संबंधाने पोलीस उपायुक्त मतांनी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गुंतवणूकदारांच्या तक्रारी आल्याचे मान्य केले. या संबंधाने १८ नोव्हेंबरला डीडीआरकडे पत्र देण्यात आले असून, त्यांच्याकडून संस्थेतील आर्थिक घोटाळ्यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

----

Web Title: Again, a credit union financial scandal is on the verge of investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.