मुकेश शाहूविरुद्ध पुन्हा एक गुन्हा
By admin | Published: October 16, 2015 03:26 AM2015-10-16T03:26:27+5:302015-10-16T03:26:27+5:30
संपत्ती हडपण्यासाठी विधवा महिलेला भरवस्तीत बेदम मारहाण करणारा आणि पीडित महिलेच्या मदतीला धावणाऱ्या महिला - पुरुषांना ...
कथित आरटीआय कार्यकर्त्याची गुंडगिरी : सुनेचा विनयभंग, सासूला शिवीगाळ धमकी
नागपूर : संपत्ती हडपण्यासाठी विधवा महिलेला भरवस्तीत बेदम मारहाण करणारा आणि पीडित महिलेच्या मदतीला धावणाऱ्या महिला - पुरुषांना रिव्हॉल्व्हर दाखवून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या मुकेश जयदेव शाहू याच्याविरुद्ध लुटमार आणि विनयभंगाचा पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी मुकेश शाहूने वर्गणी दिली नाही म्हणून किराणा दुकानाचा गल्ला लुटला तसेच आपल्या सुनेला धक्काबुक्की करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची या महिलेची तक्रार आहे. त्यावरून कळमना पोलिसांनी आरोपी मुकेशविरुद्ध लुटमार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेचे (वय ५१) किराणा दुकान आहे. ११ आॅक्टोबर ला दुपारी ४ वाजता आरोपी मुकेश शाहू त्यांच्या दुकानात आला.
त्याने महिलेला वर्गणी मागितली. महिलेने वर्गणी देण्यास नकार दिला असता आरोपीने शिवीगाळ केली. त्यांच्या दुकानात शिरून जबरदस्तीने त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील २०४० रुपये काढले. ते पाहून महिलेची सून समोर आली असता आरोपी मुकेशने महिलेच्या सुनेशी लज्जास्पद वर्तन करून तिला धक्का मारला आणि सासू-सुनेला धमकी देत निघून गेला.
मुकेशच्या दहशतीमुळे पीडित महिला गप्प राहिली. आता मात्र त्याने एका विधवेला केस धरून भरवस्तीत मारहाण केल्याचे आणि रिव्हॉल्व्हरच्या धाकावर धमकावल्याचे प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केल्यामुळे पीडित महिलेनेही आरोपी मुकेशविरुद्ध तक्रार नोंदवली. कळमना पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरी, लुटमार आणि धमकीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
२२ पर्यंत पीसीआर
दरम्यान, आरोपी मुकेशविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे त्याचे साथीदार संबंधितांना धमक्या देत फिरत असल्याची चर्चा आहे. दहशतीमुळे कुणी खुलून बोलायला तयार नाही. मात्र, पीडित महिला आणि त्यांचे परिवारासह या भागातील अनेक जण प्रचंड दहशतीत आहेत. तीन दिवसात दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे मुकेशची गुंडगिरी उघड झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक छाया गुजर यांनी गुरुवारी मुकेशला कोर्टात हजर करून त्याच्या पीसीआरची मागणी केली. गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त करायचे आहे आणि गुन्ह्यासंदर्भातील जाबजबाबाची चौकशी करायची आहे, असे त्यांनी सांगितले. मुकेशच्या वकिलांनी पीसीआरला विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने त्याला २२ पर्यंत पीसीआर मंजूर केला.