जिल्ह्यात अग्नितांडव
By admin | Published: April 18, 2017 02:13 AM2017-04-18T02:13:11+5:302017-04-18T02:13:11+5:30
चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे.
ब्राह्मणीत घर तर खरड्यात गोठा खाक : भगवानपूर शिवारात शेतीपयोगी साहित्य जळाले
नागपूर : चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे. दुसरीकडे आगीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडत आहे. जिल्ह्यात सोमवारी आगीच्या दोन आणि रविवारी एक अशा तीन घटना घडल्या. सोमवारी दुपारी मौदा तालुक्यातील खरडा शिवारात असलेला गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील घर जळाले. शिवाय, रविवारी सायंकाळी भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतीपयोगी साहित्य व जनावरांचा चारा आगीत राख झाला.
मौदा तालुक्यातील कोदामेंढी-रेवराळ मार्गावरील खरडा गावालगतच्या शेतात असलेल्या तणसाच्या गंजीला सोमवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. अल्पावधीतच आगीने रुद्र रूप धारण केले आणि ही आग पसरत जवळच असलेल्या गोठ्याला लागली. आगीच्या दाहकतेमुळे गोठ्यातील जनावरे पळण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांचे दोरखंड वेळीच कापण्यात आल्याने ती जनावरे थोडक्यात बचावली.
माहिती मिळताच खरडा व रेवराळ येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी मिळेल त्या साधनाने गोठा व तणसाच्या ढिगाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. गोठ्याची आग नियंत्रणात येईपर्यंत गोठ्यात ठेवलेले १० पोती गहू, कुटार (जनावरांचे वैरण), शेतीपयोगी साहित्य व औजारे खाक झाली. आगीची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी अग्निशमन दलाला सूचना दिली होती. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले नव्हते. तोपर्यंत नागरिकांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले होते.
कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथील रहिवासी महादेव विठोबा पर्बत यांच्या घराला सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी घरी कुणीही नसल्याने प्राणहानी झाली नाही. परंतु या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य खाक झाले. घरातून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच शेजाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यातच कळमेश्वर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भिवापूर तालुक्यातील भगवानपूर शिवारातील शेतातील कचऱ्याने पेट घेतला. ही आग हवेमुळे दुसऱ्या शेतापर्यंत पसरत गेली. त्यात शेतात साठवून ठेवलेला गुरांचा चारा आणि शेतीपयोगी साहित्याची राख झाली. (प्रतिनिधींकडून)
तरुण जखमी, जनावरे बचावली
खरडा येथील शेतात असलेल्या तणसाच्या गंजीची आग पसरल्याने आगीने जवळच असलेल्या गोठ्याला कवेत घेतले. गोठ्यात त्यावेळी तीन गाई, एक म्हैस, एक कालवड व एक वगार अशी एकूण सहा जनावरे बांधली होती. ही जनावरे आगीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु, त्यांना बांधलेल्या दोरखंडामुळे ते पळून जाऊ शकत नव्हते. त्यातच गोठ्याला आग लागल्याचे लक्षात येताच प्रकाश रामकृष्ण कोल्ली, रा. खरडा हा तरुण जीवाची पर्वा न करताना लगेच गोठ्यात शिरला. त्याने सावधगिरी बाळगत गोठ्यातील सर्व जनावरांचे दोरखंड वेळीच कापले. यात गोठ्यातील सर्व जनावरे थोडक्यात बचावली. परंतु, प्रकाश कोल्ली यांच्या चेहऱ्याला जळाल्याने इजा झाली.
चाऱ्याचे संकट
मौदा व भिवापूर तालुक्यात तणसाचा वापर जनावरांचे वैरण म्हणून केला जातो. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील शेतांमध्ये तसेच गावालगतच्या शेतांमध्ये तणसाचे मोठमोठे ढीग लावले आहेत. या ढिगाजवळ तसेच शेतात सर्वत्र कचरा पडलेला असतो. या कचऱ्यावर कुणी जळती बिडी जरी टाकली तरी कचऱ्याला लागलेली आग अल्पावधीत दूरवर पसरते. त्यामुळे तणसाचे ढीग लावताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. खरडा येथील आगीत गोठ्याजवळ ठेवलेले तणसाचे दोन्ही ढीग पूर्णपणे जळाले. शिवाय, भगवानपूर शिवारातील आगीत राजू भुसारी यांच्यासह इतरांच्या शेतात ठेवलेले तणसाचे ढीग खाक झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांवर जनावरांच्या चाऱ्याचे नवे संकट ओढवले आहे.