संस्कृत विद्यापीठाचा कर्नाटक संस्कृत विद्यापीठासोबत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:43 AM2018-03-29T00:43:09+5:302018-03-29T00:43:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे बंगळुरु येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक, संशोधन आणि वैज्ञानिक स्तरावरील विविध अभ्यासक्रम, परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, उन्हाळी प्रशिक्षण वर्ग, परिसंवाद आणि मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने यासारखे उपक्रम परस्पर सहकार्याने राबविण्यात येतील. याशिवाय दोन्ही विद्यापीठादरम्यान प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी यासंदर्भात आदानप्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही विद्यापीठाना आवश्यक अशा विविध शैक्षणिक साहित्य आणि प्रकाशनांचे आदानप्रदान करण्यात येईल
२७ मार्च रोजी या सामंजस्य करारावर कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद जोशी आणि कर्नाटक संस्कृत विद्यापीठाच्या कुलसचिव शिल्पा के.ए.एस. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, विद्यापीठ नियोजन मंडळाचे संचालक डॉ. सी.जी. विजयकुमार, कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. एम. जी. वेंकटेशम, विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे संचालक डॉ. सी. जी. विजयकुमार, कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. व्ही. शिवानी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाली भाषा विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर प्रामुख्याने उपस्थित होते. या करारांतर्गत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य, संशोधन प्रकल्प आणि प्रकाशन विभागाचे संचालक व अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना तर कर्नाटक संस्कृत विद्यापीठातर्फे वेदांत शाखेचे अधिष्ठाता डॉ. वीरनारायण एन. के. पांडुरंगी आणि शास्त्र शाखेच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही. शिवानी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करणार आहेत.