नागपूर : रुग्णालयात थुंकून घाण पसरविणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर प्रतिबंध घालण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) हाती घेतलेल्या तपासणी मोहिमेत रुग्णांच्या नातेवाइकांकडून तब्बल ४७५ खर्राच्या पुड्यांसह, ३ दारूच्या बॉटल्स जप्त केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य पकडल्याने ‘एम्स’ प्रशासनही हादरून गेले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदानुसार सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार ‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करण्यापासून रुग्णालयाच्या आत व परिसरात खर्रा, तंबाखू, सिगारेट ओढणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार २५ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ४७५ खर्राच्या पुड्या, देशी दारूच्या ३ बॉटल्स, ४० चुन्याची डब्बी, ३७ बिडीचे पॅकेट, ८५ तंबाखूच्या पुड्या, २३ पान मसाल्याच्या पुड्या पकडण्यात आल्या.
शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी वरिष्ठ डॉक्टरांच्या उपस्थितीत हे साहित्य नष्टही करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेल्या या साहित्यामुळे ‘एम्स’ प्रशासनालाही धक्का बसला आहे. ही शोध मोहीम अशीच सुरू राहिल, अशी माहिती ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली.
कारवाई सुरूच राहणार
रुग्णालयात थुंकणे, घाण पसरविणे हा गुन्हा आहे. यातच साथरोग प्रतिबंधात्मक कायदानुसार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार ‘एम्स’मध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी करून त्यांच्याकडून खर्रापासून ते तंबाखू जप्त करण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा काळापासून ही मोहीम सुरू आहे. आठवडाभर ही कारवाई करून शनिवारी हे पदार्थ नष्ट केले जातात.
-डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स