लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारचा दिवस नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी देणारा ठरला. शहरातील एम्स रुग्णालयाने दाेन लिक्विड ऑक्सिजन टॅंक उभारले आहेत. यातील एक २० किलाेलिटर तर दुसरा १० किलाेलिटरचा आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकाेप काहीसा ओसरला असला तरी ऑक्सिजन टंचाईची स्थिती पाहिलेल्या नागरिकांसाठी ही दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
देशाने यावर्षी दुसऱ्या लाटेचा भीषण कहर अनुभवला आहे. फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा भयावह प्रकाेप अगदी मेपर्यंत अनुभवला आहे. रेमडेसिविरसारख्या महत्त्वाच्या औषधांच्या टंचाईसह ऑक्सिजनसाठीची धावाधाव व ऑक्सिजनअभावी मृत्यूची भीषणता लाेकांनी अनुभवली आहे. नागपुरातही १५ दिवसाआधीपर्यंत हीच परिस्थिती हाेती. आतातर तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑक्सिजन टंचाईची स्थिती येऊ नये म्हणून एम्स, नागपूरचे प्रयत्न चालले हाेते. त्यासाठी दुसऱ्या लाटेच्या काळातच एम्सने साहित्याची खरेदी, ऑक्सिजन टँकची उभारणी, परवानगी आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थापनाची सर्व प्रक्रिया अल्प वेळात पूर्ण केली. एम्सच्या संचालिका मेजर जनरल डाॅ. विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात ॲनेस्थेसिया विभागातर्फे ऑक्सिजन टँक उभारणीपासून प्रत्यक्ष उपयाेगात आणण्यापर्यंतचे कार्य जबाबदारीने पार पाडले. काेराेनाविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही. अशावेळी येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण व अभिमानाची घडामाेड ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.