नागपुरातून बंद होणार एअर एशियाची विमान सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:33 PM2018-12-26T21:33:57+5:302018-12-26T21:34:52+5:30

नवीन वर्षांच्या सुरुवातीला एअर एशिया विमान कंपनीच्या विमानाचे संचालन नागपुरातून बंद होणार आहे. कंपनीला नागपुरातून विमान सेवा सुरू करण्यास एक वर्षही पूर्ण झाले नाही, पण ११ जानेवारीपासून विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Air-Asia flights service will be closed from Nagpur | नागपुरातून बंद होणार एअर एशियाची विमान सेवा

नागपुरातून बंद होणार एअर एशियाची विमान सेवा

Next
ठळक मुद्दे११ जानेवारीला अखेरचे उड्डाण : प्रवाशांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवीन वर्षांच्या सुरुवातीला एअर एशिया विमान कंपनीच्या विमानाचे संचालन नागपुरातून बंद होणार आहे. कंपनीला नागपुरातून विमान सेवा सुरू करण्यास एक वर्षही पूर्ण झाले नाही, पण ११ जानेवारीपासून विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७ मार्च २०१८ ला विमानसेवा सुरू केली होती. कंपनीतर्फे नागपूर ते कोलकाता आणि बेंगळुरूकरिता उड्डाणाचे संचालन करण्यात येते. कंपनीचे विमान क्र. आय ५-२६७८ नागपूर ते कोलकाता सकाळी ८ वाजता आणि आय ५-२६७६ नागपूर ते बेंगळुरू १२.५० वाजता उड्डाण भरते. पण आता ११ जानेवारीला अखेरचे उड्डाण राहणार आहे. त्यानंतरची सर्व बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. कंपनीला नागपुरातून विमानाचे संचालन करण्यास तोटा होत असल्यामुळे विमानसेवा बंद करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले की, कंपनीने विमानतळावरील सेटअप परत करण्यासाठी पत्र दिले आहे.
.. तर बुकिंग का केली?
एअर एशियाच्या बेंगळुरू विमानासाठी १८ नोव्हेंबरला आठ प्रवाशांचे बुकिंग करणारे नागपूरचे निवासी रोशन मासूरकर आणि मिलिंद वैद्य यांनी बुकिंग रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी २२ जानेवारीकरिता ऑनलाईन तिकिटांची बुकिंग केली होती. तिकिट कन्फर्म असल्यामुळे कंपनीने २४ डिसेंबरला खेद व्यक्त करून तिकिट रद्द करण्यात येत असल्याचा संदेश मोबाईलवर पाठविला आहे. अशा स्थितीत कंपनीने दुसऱ्या कंपनीच्या विमानात बुकिंग करून द्यायला हवे होते. निर्धारित वेळेत संपूर्ण कुटुंबीयांसह प्रवास करण्याचा निश्चय केला होता. बेंगळुरू येथून पुढे जायचे आहे. अशा स्थितीत अनेक समस्या उद्भवल्या आहेत.
 

उड्डाणांना दोन तास उशीर
हिवाळ्यात वाढत्या थंडीसह विमानांच्या उड्डाणांमध्ये उशीर होण्याचा क्रम सुरूच आहे. बुधवारी दोन विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला.
एअर इंडियाचे एआय-६२७ मुंबई-नागपूर विमान निर्धारित वेळेऐवजी १.३६ तास उशिरा अर्थात सकाळी ८.५६ वाजता नागपुरात पोहोचले. या कारणामुळे एआय-६२८ विमान जवळपास दीड तास उशिराने सकाळी ९.१९ वाजता नागपुरातून मुंबईला रवाना झाले. इंडिगोचे ६ई-३५६ बेंगळुरू-नागपूर विमान दोन तास उशिराने सायंकाळी ५.४५ वाजता नागपुरात पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी बेंगळुरूसह दक्षिण नागपुरात धुक्याचे वातावरण होते. यामुळे बुधवारी बेंगळुरू येथून अन्य शहरांना जाणाऱ्या सर्व विमानांना उशीर झाला. त्यामुळे नागपुरातून बेंगळुरूला जाणारे ६ई-७२७ विमान १.२५ तास उशिरा सायंकाळी ६ वाजता रवाना झाले. याशिवाय ६ई-३१४ नागपूर-चेन्नई विमानाला उशीर झाला.

 

Web Title: Air-Asia flights service will be closed from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.