नागपूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली. त्यांना कमोडिटी ट्रेडिंगमध्ये बक्कळ लाभ मिळतो, असे आमिष दाखवून त्यांचे ३३ लाख रुपये गिळंकृत केले. सप्टेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान झालेल्या या बनवाबनवीची तक्रार सतीश आत्माराम नंदनकर (वय ४९) यांनी शनिवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली.
नंदनकर नागपूर विमानतळावर एअर ट्राफिक कंट्रोलर (एटीसी) म्हणून कार्यरत आहेत. ते सोनेगावच्या इंद्रप्रस्थ नगरात राहतात. सप्टेंबर २०२१ मध्ये ते ऑनलाईन सर्चिंग करीत असताना त्यांना एका कंपनीची जाहिरात दिसली. तेथे सहज म्हणून नंदनकर यांनी संपर्क केला. यावेळी एलिनी नामक महिलेने त्यांच्याशी बातचीत केली. यानंतर एलिनीने नंदनकर यांना वारंवार संपर्क करून त्यांचा विश्वास संपादन केला. पुढे त्यांना आपल्या मुंबईतील ट्रिपल डायमंड नामक कंपनीची माहिती देऊन कमोडिटी ट्रेडिंगच्या माध्यमातून तुम्हाला अल्पावधीतच लाखोंचे करोडो करता येईल, असे आमिष दाखविले.
आपल्या कंपनीची वेब लिंक पाठवून ती डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करण्यासही भाग पाडले. ही लिंक डाऊनलोड केल्यानंतर त्यांचा यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून दिला. नलिनीने नंदनकर यांच्याशी कंपनीच्या कथित वित्तीय व्यवहारासंदर्भात तिचा साथीदार जय याची ओळख करून दिली. त्याने नंदनकर यांना वेगवेगळ्या स्कीमची माहिती देऊन ३३ लाख, २३२३ रुपये गुंतविण्यास भाग पाडले.
दरम्यान, नियोजित मुदतीनंतर आरोपींनी सांगितल्याप्रमाणे कसलाही लाभ मिळाला नसल्याने नंदनकर यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. नंतर त्यांनी संपर्कच तोडला. आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आल्याने नंदनवनकर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सोनेगावचे एएसआय दुधकवडे यांनी प्रकरणाची चाैकशी केल्यानंतर शनिवारी रात्री आरोपी एलिनी आणि जय या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अनेकांची फसगत
कथित एलिनी, जय आणि त्यांच्या साथीदारांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असावी, असा संशय आहे. पोलीस त्या अनुषंगानेही तपास करीत आहेत.