अजनी रेल्वे स्थानकाला लवकरच ‘वर्ल्ड क्लास’ लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 08:13 PM2022-11-05T20:13:08+5:302022-11-05T20:14:22+5:30
Nagpur News अजनी रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याच्या कामाचे इस्टिमेट तयार झाले असून, मंजुरीसाठी ते शीर्षस्थ अधिकाऱ्यांकडे गेेले आहे.
नागपूर : अजनी रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याच्या कामाचे इस्टिमेट तयार झाले असून, मंजुरीसाठी ते शीर्षस्थ अधिकाऱ्यांकडे गेेले आहे. त्याला मंजुरी मिळताच अजनी रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
अजनी रेल्वेस्थानकावर रोज सहा ते साडेसहा हजार प्रवासी येतात. येथे सध्या एकच प्रवेशद्वार आहे. फारशा सुविधाही नाहीत. ते लक्षात घेता रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए)ने ३६५ कोटींच्या खर्चाचे स्टेशन अपग्रेडेशन वर्क हाती घेतले आहे. त्यासाठी आरएलडीएकडून अजनी वर्ल्ड क्लास स्टेशनचे कॉम्प्युराईज्ड मॉडल दोन महिन्यांपूर्वी तयार करून घेण्यात आले. या कामाचे टेंडरिंगही झाले असून, तयार करण्यात आलेले इस्टिमेट मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे. त्याला मंजुरी मिळताच हे काम सुरू होणार असल्याची माहिती आरएलडीएचे पवन पाटील यांनी दिली. माहितीनुसार, ४० महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. आरएलडीएच्या नव्या डिझाईनमध्ये पूर्वेकडच्या द्वाराला अधिक सुविधांयुुक्त करण्यावरही भर देण्यात आला आहे. स्काय वॉक, फूड प्लाझा, अद्ययावत घोषणा प्रणाली आणि डिस्प्ले बोर्ड त्याचप्रमाणे बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम, सुपर वायझर कंट्रोल आणि डेडा अधिग्रहण प्रणालीसह सीसीटीव्ही कॅमेरा नेटवर्कचाही नव्या डिझाईनमध्ये समावेश आहे. या आणि अशाच अन्य अत्याधुनिक यंत्रणा नवीन अजनी स्थानकात राहणार आहे.
चार नवे फलाट होणार
या अत्याधुनिक स्टेशनच्या कामात ४ नव्या फलाटांच्या निर्मितीचाही समावेश आहे. अपग्रेडेशनसोबतच मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटीसाठी एक बस टर्मिनलसुद्धा विकसित करण्याचे ठरले आहे.
---