लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी देशातील सर्व निवडणुका या ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्या. ईव्हीएम मशीनने निवडणुका घ्यायच्या असतील तर सोबत व्हीव्हीपॅट पेपर ट्रेल व्यवस्था आवश्यक असावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने (बीआरएसपी) केली आहे.ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीतील एकूणच गैरप्रकाराच्या विरुद्ध बीआरएसपीतर्फे बुधवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. देशात पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाला काही उपाययोजनाही पक्षातर्फे सुचवण्यात आल्या. या उपाययोजनांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर करण्यात आले. या उपाययोजनांमध्ये उपरोक्त मागणीसह निवडणूक जाहीर झाल्यापासून १० दिवसाच्या आत पक्षाने त्यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणे आणि निवडणुकीत जाहीर करण्यात आलेली आश्वासने पाळणे हे राजकीय पक्षांसाठी बंधनकारक करावे, निवडणुकीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी उमेदवारांना राज्य शासनातर्फे निवडणूक अर्थसाहाय्य व्हावे, यासाठी ठोस कारवाई करावी, सर्व राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत समाविष्ट करावे, निवडणूक मतदार नोंदणी प्रक्रिया ही सातत्याने वेळोवेळी राबवावी, परंतु मतदार नावनोंदणी व तपासणी प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात येऊ नये, प्रत्येक निवडणुकीत किमान एक महिन्यापूर्वी संपूर्ण मतदार यादी अंतिम स्वरूपात प्रकाशित करण्यात यावी, निवडणूक लवादाची निर्मिती करण्यात यावी, आरक्षित जागांवर जातीचे खोटे दाखले वापरून निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची निवडणूक रद्द झाल्यास अशा उमेदवारांना पुढील १० वर्षापर्यंत त्याच प्रकारची किंवा कोणतीही निवडणूक लढण्यास कायद्याने बंदी घालावी, आदी सुधारणांचा या निवेदनात समावेश आहे.पक्षाचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात डॉ. रमेश जनबंधू, अहमद कादर, विशेष फुटाणे, राजेश बोरकर, रमेश पाटील, छाया कुरुटकर, शरद वंजारी, पंजाबराव मेश्राम, डॉ. शीतल नाईक आदींसह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घ्याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:41 PM
पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी देशातील सर्व निवडणुका या ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्या. ईव्हीएम मशीनने निवडणुका घ्यायच्या असतील तर सोबत व्हीव्हीपॅट पेपर ट्रेल व्यवस्था आवश्यक असावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने (बीआरएसपी) केली आहे.
ठळक मुद्देबीआरएसपीची मागणी : संविधान चौकात धरणे आंदोलन