अखिल भारतीय विधी सेवा संमेलन शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 09:08 PM2019-08-16T21:08:55+5:302019-08-16T21:13:46+5:30
राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे.
वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित या संमेलनाचे शनिवारी सकाळी १०.१५ वाजता केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. रविवारी दुपारी १२.१५ वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायमूर्ती रंजन गोगोई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमानंतर राज्य विधी सेवा प्राधिकरणे आणि उच्च न्यायालय विधी सेवा समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांच्या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करणे, समाजातील गरजू व्यक्तींना नि:शुल्क व सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणे, कारागृहात विधी सेवा, गुन्हे पीडितांना भरपाई, पर्यायी वाद निवारण यंत्रणा इत्यादी मुद्यांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील.