लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवर होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला असून यंदा नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपापल्या घरीच अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.
स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. सध्या नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर कोट्यवधी लोकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत कोरोनासंबंधीच्या सूचनांचे पालन करणे अशक्य आहे. गर्दीत एखादा लक्षणेहीन कोरोनाबाधित आल्यास सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य होणार नाही. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दीक्षाभूमीवर होणारे यावर्षीचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी येत्या १४ आॅक्टोबर व अशोक विजयादशमीला २५ आॅक्टोबर २०२० रोजी सर्व नागरिकांनी आपापल्या घरीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करावे, असे आवाहनही या पत्रकाद्वारे केले आहे. स्मारक समितीचे पदाधिकारी शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून व योग्य ती दक्षता घेऊन बाबासाहेबांना यथोचित मानवंदना देतील, असेही डॉ. फुलझेले यांनी स्पष्ट केले आहे.दुकानांनाही परवानगी नाहीदीक्षाभूमीवर यंदा दरवर्षीप्रमाणे कोणताही कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे दुकानांनासुद्धा परवानगी देण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही स्मारक समितीने जाहीर केले आहे.