Unlock Nagpur; नागपुरात आजपासून ५ वाजेपर्यंत सर्व सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:05 AM2021-06-07T09:05:25+5:302021-06-07T09:10:23+5:30

Nagpur news नागपुरातील प्रशासनाने मात्र कुठलीही घाई न करता, निर्बंधांसह ‌‘अनलॉक’ची घोषणा केली आहे. यानुसार, नागपुरात सर्व दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील.

All starting from today till 5 pm in Nagpur | Unlock Nagpur; नागपुरात आजपासून ५ वाजेपर्यंत सर्व सुरू

Unlock Nagpur; नागपुरात आजपासून ५ वाजेपर्यंत सर्व सुरू

Next
ठळक मुद्देरेस्टारंटला रात्री १० पर्यंत परवानगी लग्नसमारंभात १०० व्यक्ती आणि अंत्ययात्रेसाठी केवळ ५० लोकांनाच परवानगी शाळा-महाविद्यालये बंदच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने जारी केलेल्या यादीनुसार नागपूर हे लेव्हल वन मध्ये येते. त्यानुसार, या जिल्ह्यात सर्व दुकाने व व्यापार सुरू ठेवता येते, परंतु नागपुरातील प्रशासनाने मात्र कुठलीही घाई न करता, निर्बंधांसह ‌‘अनलॉक’ची घोषणा केली आहे. यानुसार, नागपुरात सर्व दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रेस्टॉरंटला मात्र रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालये मात्र बंदच राहतील.

राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये सोमवारपासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरचा विचार केला, तर येथे पॉझिटिव्हिटी रेट : ३.८६ टक्के आणि ८.१३ टक्के ऑक्सिजन बेडचा वापर होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, नागपूर या आकडेवारीच्या आधारावर लेव्हल १च्या श्रेणीमध्ये येते. या श्रेणीच्या जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. असे असले, तरी जिल्हा व मनपा प्रशासनाने या संदर्भात कुठल्याही अतिशय काळजीपूर्वक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. रविवारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची या संदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली.

या चर्चेनंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैैठकीनंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.

पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, नागपूर हे लेव्हल वनमध्ये येत असले, तरी मागचा अनुभव पाहता, आपण सावधगिरीने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरात सोमवारपासून सर्व प्रकारची अत्यावश्यक व अन्य दुकाने ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. जीम सलून, ब्युटी पार्लरही सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक १०० टक्के क्षमतेने सुरू राहील, परंतु उभे राहून कुणालाही जाता येणार नाही. लग्न समारंभात केवळ १०० व्यक्तींनाच परवानगी राहील. सभागृहात लग्न असेल, तर ५० टक्के क्षमता बंधनकारक राहील. अंत्ययात्रेसाठी ५० लोकांना परवानगी राहील.

धार्मिक स्थळे बंदच

शाळा-महाविद्यालय व शिकवणी वर्ग बंद राहतील. केवळ प्रशासकीय कामासाठी शाळा सुरू ठेवता येईल. धार्मिक ठिकाणेही बंदच राहतील. पूजा व साफसफाईच्या कामासाठी केवळ आतमध्ये ५ लोकांना परवानगी राहील. यासोबतच स्वीमिंग पूल, अम्युजमेंट पार्क बंदच राहतील.

मॉल व सिनेमागृहेही ५ वाजेपर्यंतच

मॉल व सिनेमागृहांनाही ५० टक्के क्षमतेनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमातही १०० व्यक्तींपर्यंत घेण्यास परवानगी राहील. सभागृहात कार्यक्रम असेल, तर ५० टक्के क्षमता बंधनकारक राहील.

सायंकाळी ५ नंतर जमावबंदी

सायंकाळी ५ वाजेनंतर सर्व बाजार बंद राहील. जमावबंदी लागू होईल. शहरात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त राहील. कुणालाही विनाकारण बाहेर पडण्यास मनाई आहे. नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. सीताबर्डी, महाल, गांधीबाग यांसारख्या मुख्य बाजारपेठेचा रस्ता सायंकाळी ५ नंतर बॅरिकेड्स लावून बंद केला जाईल. ५ नंतर दुकान उघडे असल्यास कारवाई केली जाईल.

शुक्रवारी होणार परिस्थितीचा आढावा

पुढील शुक्रवारपर्यंत हे निर्बंध व शिथिलता लागू असेल. त्यानंतर, पुन्हा शुक्रवारला या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे. दर शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेेतला जाईल. यात जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले, तर निर्बंध कडक केले जातील किंवा रुग्णांची संख्या कमी कमी होत गेली, तर निर्बंध हळूहळू आणखी कमी होत हटविण्यात येतील.

Web Title: All starting from today till 5 pm in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.